मोदींनंतर लवकरच अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर

    केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) जागतिक योगदिनी (International Yoga Day) म्हणजे २१ जून रोजी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या गुरुपीठ (Gurupith) येथे येणार आहेत. गृहमंत्री शाह यांचे हस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी शनिवारी दिवसभर विविध केंद्रीय आणि स्थानिक सरकारी यंत्रणांनी आढावा घेतला.

    एप्रिल २०२२ मध्ये स्वामी सेवा मार्गाच्या असंख्य सेवेकऱ्यांच्या वतीने चंद्रकांत मोरे आणि डॉ. दिकपाल गिरासे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन समर्थ गुरुपीठाच्या कार्याबाबत माहिती दिली होती. जागतिक योग दिन आणि सद्गुरू मोरेदादा हॉस्पिटल शिलान्यास सोहळा मंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांसह अनेक मान्यवर सहभागी होण्याची शक्यता आहे.

    केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उप महानिरीक्षक दर्शनलाल गोला, राकेश कुमार, वरिष्ठ अधिकारी पारस नाथ, योगेश कुमार, स्वप्नील पाटील, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कीर्तिका नेगी, त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, मंडळाधिकारी अनिल रोकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, उपनिरीक्षक अश्विनी टिळे, राणी डफाळ यांनी आढावा घेतला.