पाटण येथे मराठा क्रांती मोर्चाचे साखळी उपोषण सुरू ; अनेक गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पाटण येथे बुधवारी साखळी उपोषणास सुरूवात झाली आहे.

    पाटण : मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पाटण येथे बुधवारी साखळी उपोषणास सुरूवात झाली आहे.
    उपोषणाला तालुक्यातील अनेक गावातून मराठा समाजाचा बहुसंख्येने पाठींबा मिळत असून अनेक गावातून उत्स्फूर्तपणे समाजातील महिला, पुरुष, तरुण, तरुणी उपस्थित रहात असल्याने उपोषणाची व्याप्ती वाढत आहे. तसेच या साखळी उपोषणाला विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार साखळी उपोषणास बसलेल्या मराठा बांधवांनी व्यक्त केला आहे.

    पाटण येथे बुधवारी सकाळी १० वाजता नवीन एसटी बसस्थानक परिसरात, नवीन पंचायत समिती समोर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साखळी उपोषणास सुरूवात केली. अंतरवाली सराटी येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. त्यांना तालुक्यातील मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. यावेळी तालुक्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच दिवसभरात अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नागरिकांनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाठींबा दिला आहे. यावेळी आरक्षण नसल्याने मराठा समाजातील युवक, युवती व त्यांच्या कुटुंबांची होणाऱ्या वाताहतीबाबत अनेक मराठा बांधवांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत सरकारने मराठा समाजाचा संयम पाहिला आहे. आता अंत पाहू नये, असे ठणकावून सांगितले.

    तालुक्यातील नेरळे, तामकणे, येराड, बनपेठ, साखरी आदी गावात नेत्यांना गावबंदी चुलीत गेले नेते.. चुलीत गेले पक्ष.. मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष! अशा आशयाचे फलक झळकावून तालुक्यातील नेरळे, तामकणे, येराड, बनपेठ, साखरी आदी गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मात्र काही गावात युवकांवर राजकीय दबाव आणून आपल्या गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. विकासकामात आपल्या गावाला झुकते माप मिळत आहे. मग नेत्यांना गावबंदी का करता? अशी दिशाभूल केली जात आहे. मात्र युवकही हुशारीने उत्तर देत, विकासकामे शासन करत आहे. विकासकामे नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. कामे केली म्हणजे काही उपकार केले नाहीत. आम्ही पण राजकीय पुढाऱ्यांना मौल्यवान मते दिली आहेत. तुम्ही आरक्षण द्या नाहीतर नेत्यांना सांगून आम्हाला नोकऱ्या द्या, असे ठणकावून सांगत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी, पाटण तालुका संभाजी ब्रिगेड तसेच रामपूर (पाटण) येथील मुस्लिम बांधवांनी उपोषणस्थळी येऊन मराठा समाजाच्या साखळी उपोषण व आरक्षणासाठी आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी त्यांचे मराठा बांधवांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.