
अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात तिसरी बैठक पार पडली. परंतु या बैठकीतून कोणताही तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यातील बैठक निष्फळ ठरली.
कोल्हापूर : अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात तिसरी बैठक पार पडली. परंतु या बैठकीतून कोणताही तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यातील बैठक निष्फळ ठरली. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी १९ नोव्हेंबर रोजी चक्का जाम आंदोलन (Chakka Jam Agitation) करून ऊस तोडी बंद राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी खासदार बैठकीतून बाहेर आल्यावर म्हणाले की, ”बराच काळ चर्चा झाली. परंतु या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. ज्या कारखानदारांनी ३ हजार दर दिला, त्यांनी ३१०० रुपये करावी तर ज्यांनी ३२०० केला आहे त्यांनी तोच दर ठेवावा, असे कारखानदारांकडून प्रस्ताव देण्यात आला. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमावी आणि २१ तारखेपर्यंत कमिटीला किती देता येते या संदर्भामध्ये माहिती सादर करावी, असे सांगण्यात आले.
यावर आम्ही विरोध केला आहे. कारण ही समिती वेळ काढू असणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की, कानपूर शुगर टेक्नॉलॉजी कानपूर यांच्या उत्पादन शुल्काच्या खर्चाचे जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे उत्पादन खर्च करावा लागेल. त्याला काही कारखानदारांचा आक्षेप आहे. परंतु, यांनी केलेल्या उत्पादन खर्च काढलेला आहे. याला मान्यता नाही. एका बाजूला ११.८० रिकव्हरी असणारे कारखाने एफआरपी पेक्षा ५६२ रुपये जास्त देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला साडेबारा ते तेरा रिकव्हरी असणारे कारखाने त्याचा तोडणी वाहतूक खर्च कमी आहे.
तरीही कारखानदार ऊसाचा दर द्यायला तयार होत नाहीत. ते जे निर्णय घेतील याला आमची मान्यता नाही म्हणून ऊस तोडी बंदच राहणार असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मागचा निर्णय होत नाही तोपर्यंत पहिली उचल किती घ्यायची याला आम्ही मान्यता देणार नाही, असेही शेट्टी म्हणाले. आम्ही आता जिल्ह्यातील वैयक्तिक पातळीवर विचारणा करणार आहे. तुम्ही किती द्यायला तयार आहे हा प्रस्ताव त्यांना देणार आहे. यावर आम्ही ज्या त्या कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बसून विचार करू आणि मार्ग काढू असेही शेट्टी म्हणाले.
या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्यातील बरेच कारखानदार उपस्थित होते. ही बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्यासह शेतकरी संघटना आणि पदाधिकारी उपस्थित होते.