२५ नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार; राजू शेट्टींचा इशारा

महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही सरकारने प्रलंबित निर्णय घेतला नसल्याने २५ नोव्हेंबरला राज्यभरात स्वाभिमानी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

  कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही सरकारने प्रलंबित निर्णय घेतला नसल्याने २५ नोव्हेंबरला राज्यभरात स्वाभिमानी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी जालंधर पाटील, सावकार मादंनाईक, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.

  ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. मंत्र्यांना आता मैदानातच जाब विचारला जाईल. १०० खोके घालूनही सरकार येऊ देणार नाही, असा गर्भित इशाराही दिला. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रोखून राज्यमार्गावरही आंदोलन केलं जाणार आहे. अनेक राज्यमार्ग, जिल्हा मार्ग बंद ठेवू, असेही ते म्हणाले.

  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक व साखर उद्योगामध्ये पसरलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी आणि केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर आणि सांगलीत ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूर जिल्ह्यात गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले.

  या मागण्यांकडे लक्ष वेधले

  कोल्हापूर मार्गावर ट्रॅक्टरमधून सुरु असलेली ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखली. एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा राज्य शासनाने केलेला कायदा रद्द करावा, वजन काटे ऑनलाईन झाले पाहिजेत, रिकव्हरीतील चोरी थांबली पाहिजे, तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत, आदींसह अन्य मागण्यांकडे स्वाभिमानीने लक्ष वेधले.

  दोन दिवस ऊसतोड बंद

  ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यातील एफआरपी देण्याऐवजी एकरकमी देण्यात यावी, हिवाळी अधिवेशनात यासाठीचा कायदा मंजूर करावा, एफआरपीचे सूत्र बदलून त्यामध्ये वाढ करावी, या प्रमुख मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी राज्यभरात दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात आले होते.