challenge to underground parking under patwardhan udyan decision based on wrong and misleading report of parking department claim through pil nrvb

वांद्रे पश्चिम एसव्ही रोड वरील नॅशनल महाविद्यालयासमोरील पटवर्धन उद्यानाच्या आसपास कोठेही वाहनतळ उभारण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तरीही पालिकेच्या वाहनतळ विभागाच्या चुकीच्या आणि दिशाभूल कऱणाऱ्या अहवालाचा आधार घेऊन पटवर्धन उद्यानाखाली भूमिगत वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ता झोरू बाथेना, समर्थ दास आणि ॲलन अब्राहम यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे.

    मयुर फडके, मुंबई : वांद्रे पश्चिमेतील (Bandra West) पटवर्धन उद्यानाखाली भूमिगत वाहनतळ (Underground parking under Patwardhan Park) बांधण्याचा घाट बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) घातला असून त्यांना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (High Court, Mumbai) जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे. याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी जून महिन्यात निश्चित केली आहे.

    वांद्रे पश्चिम एसव्ही रोड वरील नॅशनल महाविद्यालयासमोरील पटवर्धन उद्यानाच्या आसपास कोठेही वाहनतळ उभारण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तरीही पालिकेच्या वाहनतळ विभागाच्या चुकीच्या आणि दिशाभूल कऱणाऱ्या अहवालाचा आधार घेऊन पटवर्धन उद्यानाखाली भूमिगत वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ता झोरू बाथेना, समर्थ दास आणि ॲलन अब्राहम यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे. याचिकाकर्त्यांचे वकील जमान अली यांनी गुरुवारी प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर याचिका निदर्शनास आणून दिली त्याची दखल घेऊन न्यायालयाने सुनावणी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर जूनमध्ये निश्चित केली.

    काय आहे याचिकेत दावा

    १ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळात पटवर्धन उद्यान विस्तारले असून त्याला पर्यावऱण वन विभाग आणि हवामान बदल विभागाने जंगल म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे अशा संरक्षित वनक्षेत्रात कोणतेही वाहनतळ उभारले जाऊ शकत नाही, असा दावा याचिकेत केला आहे. पालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांना पटवर्धन पार्कमध्ये भूमिगत वाहनतळ उभारता अथवा इतर कोणत्याही तत्सम स्वरूपाच्या प्रकल्पासाठी नैसर्गिक माती किंवा मातीचे उत्खनन करण्यास कायमस्वरुपी प्रतिबंधित करावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.

    भूमिगत वाहनतळ उभारण्याच्या निर्णय घेताना पर्यायी जागांचा आणि पर्यावरणाच्या संभाव्य नुकसानाचा कोणताही विचार केलेला नाही. या परिसरात पावसाळ्यात पाणी साचते. अशातच दोन मजल्यापर्यंतच्या तळघरासाठी कोणतेही उत्खनन केल्यास पाणी साचण्यासाठी रोखणाऱ्या जमिनीतील नैसर्गिक शोषकांचे (स्पंज) नुकसान होईल, असा दावाही याचिकेत केली आहे.

    हवामान बदलाचे परिणाम सुसह्य करण्यासाठी मोकळ्या जागा संरक्षित करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. पावसाळ्यात मुंबई येणाऱ्या पुरसदृश्य स्थितीला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने मुंबई हवामान कृती आराखडा तयार केला असून त्याअंतर्गत मोकळ्या जागा संरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, पालिकेची भूमिका या धोरणाच्या परस्पर विरोधात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. डीसीपीआर २०३४ नुसार, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या खाली भूमिगत वाहनतळ बांधण्याची तरतूद आहे. पटवर्धन उद्यानाच्या खाली बांधकाम करण्याचा निर्णय घेताना या पर्यायांचा विचार करण्यात आलेला नाही.

    साल २०१८-१९ मध्ये, पालिकेने पटवर्धन उद्यानाच्या खाली भूमिगत वाहनतळ उभारण्याची योजना आखली होती. मात्र, स्थानिकांचा आक्षेप आणि जन आक्रोशामुळे योजना रद्द केली होती. मात्र, आता रहिवाशांचा अनेक आक्षेप असूनही, पालिकेनेने योजना पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरात वाहनतळ उभारण्याची आवश्यकता असल्याचा दावा पालिकेच्या वाहनतळ विभागाने एका अहवालाचा आधारे केला आहे.

    मात्र, हा अहवाल चुकीच्या आणि दिशाभूल कऱणारा असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच वांद्रे पश्चिम परिसरात अनेक ठिकाणी पे ॲण्ड पार्कची सुविधा तसेच सार्वजनिक रस्त्यांवरही पार्किंगची व्यवस्था आहे. याशिवाय लिंकिंग रोड येथे पार्किंगची जागा उपलब्ध आहे मात्र तेथे अतिक्रमण झाले असून हा गैरवापर रोखण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे याचिकेत नमूद केले आहे.