केडीएमसी स्मार्ट सिटीतील कॅमेरे फक्त शोभेपुरतेच? स्मार्टसिटी सीसीटीव्ही कॅमेरासमोरील चेंबर अनेक दिवसांपासून तुटलेले

शहरातील नागरी समस्या (issues) यामधून दिसत नसतील, तर हे कॅमेरे शोभेपुरतेच आहेत का? असा सवाल माजी नगरसेवक मोहन उगले (Correspondent Mohan Ugle) यांनी उपस्थित केला आहे. कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा (beturkar pada) येथील शक्ती बेतूरकर चौकात चेंबर उघडे असून, याठिकाणी बांबू आणि कपड्याच्या साहाय्याने झाकण्यात आले आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) स्मार्टसिटी अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरांचे (CCTV camera) जाळे पसरले आहे. मात्र शहरातील नागरी समस्या (issues) यामधून दिसत नसतील, तर हे कॅमेरे शोभेपुरतेच आहेत का? असा सवाल माजी नगरसेवक मोहन उगले (Correspondent Mohan Ugle) यांनी उपस्थित केला आहे. कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा (beturkar pada) येथील शक्ती बेतूरकर चौकात चेंबर उघडे असून, याठिकाणी बांबू आणि कपड्याच्या साहाय्याने झाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चेंबरच्या समोरच महानगरपालिकेने बसविलेला सीसीटीव्ही कॅमेरा असून कॅमेऱ्यातून पालिका अधिकाऱ्यांना नागरी समस्या दिसत नाहीत का? असा सवाल मोहन उगले यांनी केला आहे.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत विविध प्रकल्प राबवत असून यातील पालिकेचे अनेक प्रकल्प हे वादात सापडले आहेत. कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील शक्ती बेतूरकर चौकातील चेंबर हे गेल्या दोन वर्षांपासून वारंवार तुटत असते. ते झाकण्यासाठी झाडाच्या फांद्या, प्लास्टिक पिशव्या, कपडा आदी वापरण्यात येते. मात्र हे धोकादायक असून या चेंबरच्या आजूबाजूला दोन शाळा असून हजारो विद्यार्थी या शाळेत शिकतात. या विद्यार्थ्यांची याठिकाणी सदैव वर्दळ असते. त्याचप्रमाणे हा रस्ता येथील मुख्य रस्ता असल्याने याठिकाणी गाड्या आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. यामुळे एखादा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.

    याबाबत केडीएमसीचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील या समस्येचे निराकरण होत नसल्याचा आरोप मोहन उगले यांनी केला आहे. तर अनेक पालिका अधिकाऱ्यांकडे अनेक विभागांचा पदभार असल्याने त्यांगना नागरिकांना न्याय देणे शक्य होत नसल्याचे उगले यांचे म्हणणे आहे. शक्ती बेतूरकर चौक सुशोभीकरण करताना त्याची उंची जास्त असल्याने नागरिकांना समोरून येणारी वाहने देखील दिसत नाहीत. तर याच चौकात मल्लखांब शिल्प उभारण्यात आले असून, या शिल्पातील खेळाडुचा पाय तुटला आहे. या सर्व गोष्टी पालिकेच्या सीसीटीव्ही कॅमेरा समारोच असून स्मार्ट सिटीतील या कॅमेरातून केडीएमसी प्रशासनाला या गोष्टी दिसत नाहीत. हे दुर्दैव असल्याचा आरोप मोहन उगले यांनी केला आहे. तर येथील चेंबरचे झाकण आणि या शिल्पातील खेळाडूची प्रतिकृती लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.