राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचीच शक्यता

१८ जूनपासून मात्र दक्षिण कोकणात पाऊस काही प्रमाणात जोर धरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मोसमी पावसाचा प्रवास गेल्या दोन दिवसांपासून थांबला आहे.

    पुणे – निम्म्या महाराष्ट्रात मोसमी पाऊस दाखल झाला असला, तरी पुढील पाच ते सहा दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १८ जूनपासून मात्र दक्षिण कोकणात पाऊस काही प्रमाणात जोर धरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मोसमी पावसाचा प्रवास गेल्या दोन दिवसांपासून थांबला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तो विदर्भाच्या काही भागांत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

    दक्षिण कोकणातून १० जूनला मोसमी पावसाचा प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर ११ जूनला त्याने मोठा पल्ला गाठत थेट मुंबई-पुण्यापर्यंत मजल मारली. १३ जूनला मध्य महाराष्ट्र आणि कोकण ओलांडून त्याने मराठवाड्यात प्रवेश करीत निम्मा महाराष्ट्र व्यापला. मोसमी पाऊस दाखल होण्यापूर्वी या सर्व भागांत एक-दोन दिवस पाऊस झाला. मोसमी पाऊस पोहोचल्यानंतर हलक्या सरी कोसळल्या, पण अद्याप एकाही ठिकाणी मोठा पाऊस झाला नाही. पुढील पाच ते सहा दिवसही राज्यात काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्यात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.