चंदगड तिलारी मार्गाचे काम अर्धवट धुळीमुळे प्रवाशी हैराण ; ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे काम रेंगाळले

स्थानिक लोक प्रतिनिधींचा आंदोलनाचा इशारा,लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्याची मागणी

    चंदगड : ठेकदाराच्या दुर्लक्षामुळे चंदगड-तिलारी  या राज्यमार्गाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट झाल्याने त्या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून अपघातांना निमंत्रण मिळत असून खड्ड्रयांमुळे रस्त्यावरून प्रवास करताना कंबर, पाठदुखी व डोळ्यांचे आजार बळावत आहेत.

    हेरे परिसरातील अपूर्ण रस्त्यामुळे अनेक घरात व दुकानात धूळ जाऊन नागरिक आजारी पडत आहेत. तर प्रवासीवर्गांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. या मार्गावरून गोवा व बेळगाव मार्गाला प्रवास करता येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरू असते. त्यामुळे हा मार्ग त्वरित होणे अत्यंत गरजेचे आहे. गेले तीन वर्ष फक्त सारवासारव  करण्याचा प्रयत्न करून ठेकेदार वेळकाढूपणा करत आहे. हे स्पष्ट होत असल्याने प्रवाशीवर्गाकडून संताप व्यक्त होत आहे.‌

    मागील दोन ते तीन वर्षापासून या मार्गाचे काम सुरू आहे. अनेकदा कामात संतगती आणि निकृष्ट दर्जामुळे या मार्गावरील ठेकेदाराला वेळोवेळी प्रवासी व लोकप्रतिनिधींकडून सूचना देण्यात आल्या होत्या. कोरोना काळापासून या मार्गाचे काम सुरू आहे. सध्या काम अंतिम टप्प्यात आहे मात्र काही ठिकाणी रस्त्याचे काम रखडल्यामुळे प्रवासीवर्गाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हेरे-मोटणवाडी येथील एक किलोमीटर अंतराचा मार्ग पूर्णपणे उकरून ठेवून एक वर्ष पूर्ण झाले. तरी या कामाकडे ठेकेदाराचे लक्ष नसल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पहिले काम करा अन्यथा दारात येऊन आंदोलन करू, असा इशारा येथील लोकप्रतिनिधी देत आहेत. तरीही ठेकदार त्यांना जुमानत नाही, अशी तक्रार आहे. मागील पावसाळ्यापूर्वी अंतिम टप्प्यात नदीवरील पूल, नाल्यांवरील पूल पूर्ण झाली पण त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यामुळे कामे थांबली. अखेर पावसाळा संपून दोन महिने उलटले तरी कामाला सुरुवात नसल्याने काम सुरू होणार तरी कधी? असा प्रश्न विचारला जातो आहे. अनेकदा या मार्गाच्या चांगल्या कामाकरिता लोकांनी तितकेच सहकार्य केले असून काम लवकरात लवकर सुरू व्हावे, याकरिता ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन मोर्चाही कार्यालयावर मोर्चा काढण्यात आले आहेत. पुन्हा तोच पवित्रा हातात घ्यावा, अशी अपेक्षा ठेकेदाराची आहे का? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला समज द्यावी आणि  काम लवकरात लवकर सुरू करायला भाग पाडावे, अशी मागणी येथील नागरिक व प्रवासी, वाहतूकदार यांच्या कडून होत आहे.

    सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याची गरज….
    अपूर्ण रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. या रस्त्याचे काम वेळेत झाले तर वाहतुकीला व्यत्यय  येणार नाही. परिसरात धूळ साचणार नाही शिवाय अपघात घडणार नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला सांगून काम पूर्ण करून घ्यावे, अशी सूचना  हेरे येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच विशाल बल्लाळ यांनी केली आहे.