चांदाेली धरण परिसर बनले मृत्यूचे केंद्र; धरणाच्या पायथ्याजवळील डोहात बुडून एका तरुणाचा मृत्यू

मंगळवारी (दि. ०७) रोजी मित्रांसमवेत चांदोली पर्यटनासाठी आलेल्या अभिषेक अशोक मंडले (वय २५) याचा चांदोली धरणाच्या पायथ्याजवळील सांडव्यातून वारणा नदी पात्रात पडणाऱ्या पाण्याच्या डोहात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने व पाण्यात दम लागल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  शाहुवाडी : नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक भेट देत असलेल्या चांदोली धरण परिसरातील सुरक्षेच्या अभावामुळे आतापर्यंत सहा बळी गेले आहेत. मंगळवारी (दि. ०७) रोजी मित्रांसमवेत चांदोली पर्यटनासाठी आलेल्या अभिषेक अशोक मंडले (वय २५) याचा चांदोली धरणाच्या पायथ्याजवळील सांडव्यातून वारणा नदी पात्रात पडणाऱ्या पाण्याच्या डोहात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने व पाण्यात दम लागल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
  चांदोली धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न कायमसाठी निकालात निघावा म्हणून उखळू हद्दीत पोलिस चौकी बांधण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये धरण प्रशासनाने पाणी व लाईटची व्यवस्था केली नसल्याने येथे सुरक्षारक्षक कार्यरत नाहीत. सुरक्षेच्या अभावामुळे काल आणखी एक बळी गेला असल्याचे सर्वसामान्यांमधून बोलले जात आहे.
  हिरव्यागर्द झाडीने नटलेल्या डोंगर-दऱ्या आणि मध्यभागी असलेले चांदोली धरण पाहण्यासाठी हजारो पर्यटक या परिसरास रोज भेट देत असतात. पर्यटकांच्या वर्दळीमुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. मात्र आता पर्यटनाऐवजी हा परिसर हुल्लडबाजीचा अड्डा व येथील खुलेआमपणे करण्यात येत असलेल्या मद्यपानामुळे मृत्यूचे केंद्र ठरू लागला आहे. याआधी अक्षय पाटील हा महाविद्यालयीन युवक, डॉक्टर राहूल मगदुम, तुषार कुंभार, सुधीर कांबळे, करण कळंत्रे व आता अभिषेक मंडले यांचा बळी गेला आहे.
  पोलीस प्रशासनाला जाग येणार?
  या सर्वच घटना या शाहुवाडी तालुक्यातील उखळु नजीक धरणाच्या वक्राकार दरवाजांसमोर असलेल्या डोहात व वारणा नदी पात्रात घडल्या आहेत. येथील सुरक्षेच्या अभावामुळे या ठिकाणापर्यंत पर्यटकांना विनासायास पोहचता येत असल्याने येथील पर्यटन पर्यटकांच्या जीवावर बेतू लागले आहे. आतापर्यंत सहा बळी गेले आहेत. आणखी किती बळी गेल्यानंतर धरण प्रशासनाबरोबरच शाहुवाडी पोलीस प्रशासनाला जाग येणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
  तातडीने सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करा
  पर्यटकांच्या जेवणावळ्या, मद्यधुंद अवस्थेतील तरूणाईचे नाचगाणे, यातून घडणारे लहान-सहान अपघात आणि तरूणांच्या दोन गटांमध्ये होत असलेले राडे व दुर्देवी घटना रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने येथे सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावी, असी मागणी होत आहे. चांदोली धरणाच्या पायथ्याला उखळू हद्दीत पोलिस चौकीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र येथे अद्याप धरण प्रशासनाकडून पाणी व लाईट जोडणी केली नसल्याने सुरक्षेचा अभाव आहे.

  येथील चौकीमध्ये पाणी व लाईटच्या व्यवस्थेसाठी निधी मंजूर व्हावा, याकरिता दोनदा प्रस्ताव दिला आहे. मात्र शासनाकडून निधीची उपलब्धता होत नसल्यामुळे हे काम होऊ शकलेले नाही.

  -गोरख पाटील, शाखा अभियंता-वारणा पाटबंधारे, वारणावती