आमदार अपात्रतेच्या निर्णयावरुन ठाकरे गट आक्रमक; ही गेमसेटिंग असल्याचा चंद्रकांत खैरे यांचा दावा

शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज निर्णय देणार आहेत. निकाल ही गेमसेटिंग आहे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

    छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे आज (दि.10) निर्णय देणार आहेत. आमदार अपात्रतेच्या निकालावर (MLA Disqualification Case) सर्व राज्याचे लक्ष लागले असून राज्यातील सरकारवर (State Govt) याचा काही परिणाम होणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सुनावणीवर प्रतिक्रिया दिली असून शिंदे गटावर (Shinde Group) निशाणा साधला आहे. निकाल ही गेमसेटिंग आहे असा गंभीर आरोप देखील खैरे यांनी केला.

    छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा अध्यक्षांसह बंडखोर नेत्यांना टोला लगावला आहे. निकालाआधी मुख्यमंत्री शिंदे व विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी भेट घेतल्यामुळे टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात याचा अर्थ काय असेल समजत नाही.न्यायदेवता आरोपीला भेटत आहे हे काही योग्य नाही. हे तर गौडबंगाल आहे यांचा हा गेमसेटिंग आहे. असा घणाघात चंद्रकांत खैरे यांनी केला.

    बंडखोर नेत्यांवर निशाणा साधत चंद्रकांत खैरे म्हणाले, कुणीही शिंदे गटात जाण्यासाठी रांगेत उभे नाही, एखादा असेल बाकीचे आहेत ते सगळे एकनिष्ठ आहेत. बाळासाहेबांनी त्यांना सर्वकाही दिले असे ते म्हणतात पण येणाऱ्या निवडणुकीत त्यांना याचा अनुभव येईल. त्यांनी अतिरेक केला आहे. बंडखोरी करून खोकेच्या माध्यमातून असे करत असेल तर हे टिकणार नाही. जर लोकसभेची निवडणुक घेतली तर यांचं सगळं संपेल अशा शब्दांमध्ये चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. प्रभू रामचंद्र हा सत्यवादी आहे त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे कळेल असे देखील खैरे म्हणाले आहेत.