नाराज आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना चंद्रकांत खैरेंचे फोन; नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

नॉटरिचेबल असलेल्या आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून सुद्धा या आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क केला जात असून, ते कुठ आहे याची माहिती घेतली जात आहे.

    मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. शिंदे 25 पेक्षा जास्त आमदारांसह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानं महाविकास आघाडीचं सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

    दरम्यान दुसरीकडे नॉटरिचेबल असलेल्या आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून सुद्धा या आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क केला जात असून, ते कुठ आहे याची माहिती घेतली जात आहे. यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, कुठेही कोणीही नाराज नाही. सगळे इथेच असून सगळे येतील. सर्व कडवट शिवसैनिक असल्याने ते कुठेही जाणार नाहीत. आता एकनाथ शिंदेच्या सोबत किती आहेत सांगता येणार नाही. या सर्वांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार आहे. तसेच माझ सुद्धा काम आहे त्यांची मनधरणी करणे त्यामुळे प्रयत्न करतोय. तसेच आमदारांच्या नातेवाईकांशी सुद्धा बोलणं सुरु असल्याच खैरे म्हणाले.

    औरंगाबादच्या या आमदारांचा समावेश…

    औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांच्या यादीत मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत,आमदार संजय शिरसाठ, वैजापूर आमदार रमेश बोरनारे हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील या पाच आमदारांचा सुद्धा समावेश एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे.