चंद्रकांत पाटील यांनी ईशाळवाडीच्या मुलांसोबत केली दिवाळी साजरी, भेटवस्तूंनी मुले आनंदित

ईर्शाळवाडीच्या दुर्घटनेत आपल्या आप्तांना गमावलेल्या मुलांना शहरातील प्रत्येक घराशी जोडण्याची गरज आहे. जेणेकरुन त्यांना कुटुंबाचं प्रेम आणि माया मिळू शकेल, असे भावनिक आवाहन नामदार चंद्रकांत पाटील यांनी केले. 

    मुंबई :  ईर्शाळवाडीच्या दुर्घटनेत आपल्या आप्तांना गमावलेल्या मुलांना शहरातील प्रत्येक घराशी जोडण्याची गरज आहे. जेणेकरुन त्यांना कुटुंबाचं प्रेम आणि माया मिळू शकेल, असे भावनिक आवाहन नामदार चंद्रकांत पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा आनंद वंचितांसोबत साजरा करण्याचा संकल्प केला असून, या अंतर्गत राष्ट्रप्रथम ट्रस्ट, वंदेमातरम संघटना, दशरथ भानगिरे ट्रस्ट, युवा वाद्य पथक ट्रस्टच्या माध्यमातून आनंद मेळावा आयोजित केला होता. या मध्ये ईशाळवाडीच्या दुर्घटनेत आपल्या आप्तांना गमावलेल्या मुलांसोबत चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीचा आनंद साजरा केला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
    पाटील म्हणाले की, ईर्शाळवाडीची दुर्घटना अतिशय भीषण होती. ज्यामुळे किल्लारीच्या भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या. ईर्शाळवाडीच्या दुर्घटनेत अनेकांना आपल्या आप्त स्वकीयांना गमवावे लागले. अनेक मुलांच्या डोक्यावरचा आधार हरपला. त्यामुळे या दुर्घटनेतील अनाथ मुलांना आई-वडिलांची माया, प्रेम मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील सधन कुटुंबियांनी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून, ईर्शाळवाडीच्या दुर्घटनेतील अनाथ मुलांना आपल्या मायेने जोडलं पाहिजे.
    पाटील पुढे म्हणाले की, ईर्शाळवाडीच्या मुलांच्या जीवनात यंदाच्या दिवाळीत दु:खाची किनार आहे. पण फराळ आणि खेळाचे साहित्यच्या माध्यमातून या मुलांचे कमी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आज या मुलांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंद हा पुढील वाटचालीसाठी ऊर्जा-प्रेरणा देणारा आहे.