याचा विसर न व्हावा! चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात घेतली उद्धव ठाकरेंची भेट : ‘भीक मागणे’ वक्तव्याच्या समर्थनार्थ प्रबोधनकारांचेच ऐतिहासिक संदर्भ देत पुस्तकही दिले भेट

दररोज एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये करणे, एकमेकांची उणीदुणी काढणे, अरे ला का रे करणे, खोटं बोल पण रेटून बोलणारे विरोधी पक्षातील नेतेच आज एकमेकांच्या समोर उभे ठाकले. निमित्त हिवाळी अधिवेशनाचं असलं तरी आजच्या या भेटीचा न भूतो न भविष्यती असा दुर्मिळ योगायोग चंद्रकांत पाटील यांनी जुळवून आणला आणि आपली बाजू कशी योग्य आहे हे उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला.

  नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session 2022) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) आज नागपुरात (Nagpur) आहेत. याच संधीचा फायदा घेत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज थेट उद्धव ठाकरेंच्या यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

  प्रबोधनकारांचेही शब्दही तेच

  भेटीत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरे यांचे एक पुस्तक भेट दिले व पुस्तकातील ‘भीक मागणे’ या संदर्भातील त्या काळचा उल्लेखही वाचून दाखवला. या पुस्तकात ‘एखाद्या कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे असाच अर्थ होतो’, असा उल्लेख आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना वाचून दाखवले.

  बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरून एकच गदारोळ झाला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली होती. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना आपली बाजू समजावून सांगितली.

  उद्धव ठाकरेंचे फक्त स्मितहास्य

  आज चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘माझी जीवनगाथा’ हे पुस्तकच भेट दिले. याच पुस्तकात एखाद्या कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे असाच अर्थ होतो, असा उल्लेख आहे. हा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दाखवला.

  या भेटीचा व्हिडिओही आता समोर आला आहे. यात उद्धव ठाकरे केवळ स्मितहास्य करताना दिसत आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. उद्धव ठाकरे यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

  दरम्यान, आज चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शब्दाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक भेट दिले व त्यातील संदर्भ वाचून दाखवला, त्यावेळी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे तसेच भाजप आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाडही उपस्थित होते.