पालकमंत्रीपदाच्या बदलानंतर चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांसोबत तासभर चर्चा; भेटीचं कारण काय ?

पुण्याचे पालकमंत्रीपद भाजपच्या चंद्रकांत पाटलांकडून काढून घेऊन ते अजित पवारांना दिल्यानंतर आता चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी एक तास चर्चा केली.

    मुंबई : पुण्याचे पालकमंत्रीपद भाजपच्या चंद्रकांत पाटलांकडून काढून घेऊन ते अजित पवारांना दिल्यानंतर आता चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी एक तास चर्चा केली. यामध्ये पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून त्यांच्याच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी एक तास चर्चा झाली, पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा समोर आली. मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी ते वर्षा निवासस्थानी आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पुण्याचे पालकमंत्री पद गेल्यानंतर ही भेट झाली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

    पाटील आणि मुख्यमंत्र्यांची भेट पूर्वनियोजित

    चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी दिली आहे. चंद्रकात पाटील आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार हे आधीच ठरलेलं होतं, भेटीचा विषय पालकमंत्री पद हा नाही. अजित पवार जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हाच सर्वांना समजलं होतं की राष्ट्रवादीलाही काही जागा द्याव्या लागणार आहेत. या सगळ्या विरोधकांनी भासवलेल्या गोष्टी आहेत, असं किरण पावसकर यांनी म्हटलं आहे.