नवीन काही आलं की माझ्या डोक्यावर टाकायचं ; पालकमंत्री पदाच्या जबाबदारीवर चंद्रकांत पाटील यांचे उपरोधिक भाष्य

राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शीतयुद्धही रंगले होते.

    पुणे : पुण्याचे पालकमंत्री पद काढून घेऊन ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्री करण्यात आले. या नव्या जबाबदारीवर पाटील यांनी उपरोधिक शब्दांत भाष्य केले.

    राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शीतयुद्धही रंगले होते. सत्तेतील नव्या मित्रासाठी झळ सोसत अजित पवार यांच्यासह त्यांच्या आमदारांना विविध जिल्ह्याचे पालकमंत्री करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यात चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून घेऊन अजित पवार यांच्याकडे देण्यात आले. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी एका मोठ्या कामासाठी केलेली ही एक छोटी तडजोड आहे असे सांगितले होते.

    या पार्श्वभूमीवर डीईएस पुणे विद्यापीठाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांना मिळालेल्या पालकमंत्री पदावर उपरोधिक भाष्य केले. ‘पालकमंत्री म्हणून मला अतिशय जवळचे जिल्हे दिले आहेत. सोलापूर दहा किलोमीटवर, तिथून अमरावती पाच किलोमीटर, अर्धा किलोमीटरवर पुणे आणि कॅबिनेट मीटिंगसाठी मुंबईला जायला शून्य किलोमीटर… गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांत माझं असं केलं आहे, की नवीन काही आलं की माझ्या डोक्यावर टाकायचं,’ असे पाटील म्हणाले.
    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे विद्यापीठाच्या उद्घाटन कार्यक्रमात पाटील बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष शाहू छत्रपती, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष रवींद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

    -आता विद्यार्थ्यांना परीक्षेत दोन्ही भाषांमध्ये लिहिता येणार उत्तरे
    ‘‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व दिले असून राज्यात मराठीतून व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आता तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका आता मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना पेपरमधील उत्तरे देखील दोन्ही भाषेत लिहिता येणार आहेत,’’ अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

    ‘‘राज्यात आतापर्यंत दीड हजार शिक्षण संस्थांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. परंतु उच्च शिक्षण संस्थांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी न केल्यास अशा संस्थांना जगातील कोणत्याही विद्यापीठांची संलग्न होण्याची दारे खुली राहतील. परंतु या शिक्षण संस्था कोणत्याही भारतीय विद्यापीठांशी संलग्न राहणार नाही.’’ - चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

    - चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री