pankaja munde and uddhav thackeray

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर भाजपात अन्याय होत असल्याचं सांगण्यात येतयं. सध्या पंकजा मुंडे यांच्यावर भाजपाकडून राष्ट्रीय जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र राज्याच्या राजकारणात त्यांना संधी देण्यात आलेली नाही.

  औरंगाबाद: भाजपाच्या मराठवाड्यातील दिग्गज नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपात (BJP) अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. यातच त्या बंड करणार का, दुसऱ्या पक्षात जाणार का, अशी चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहे. आता शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडे यांनी ठाकरे गटात यावं अशी ऑफर देऊन पुन्हा एकदा या चर्चेला तोंड फोडलंय. शिंदे यांच्यानंतर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनीही पंकजा मुंडेंवर भाजपात अन्याय होत असल्याचं सांगत, त्यांना ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली आहे.

  काय म्हणाले चंद्रकांत खैरे ?
  भाजपा राज्यात फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपात अन्याय होत असल्याचं खैरे म्हणालेत. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे राज्यात भाजपा पक्ष वाढला. मात्र भाजपातील अंतर्गत राजकारणाच्या त्या बळी ठरलेल्या आहेत. असं खैरे म्हणालेत. सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडे यांना ठाकरे गटाचं दिलेलं निमंत्रण हे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुनच दिलं असेल, असंही खैरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले असतील, असं सांगितलं असावं. आमच्या कन्येनं शिवसेना ठाकरे गटात यावं असं आवाहनही खैरे यांनी केलंय.

  कधीही काहीही घडू शकतं -खैरे
  उद्धव ठाकरेंशी याबाबत चर्चा झाली असेल तर कधीही काहीही घडू शकतं, असं सूचक विधानही चंद्रकांत खैरे यांनी केलंय. गोपीनाथ मुंडे यांचा युतीमधला वारसा या निमित्तानं ठाकरे गटात आला तर त्याचा फायदाच होईल, असंही खैरे म्हणालेत.

  पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेणार?
  विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्यावर भाजपात अन्याय होत असल्याचं सांगण्यात येतयं. सध्या पंकजा मुंडे यांच्यावर भाजपाकडून राष्ट्रीय जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र राज्याच्या राजकारणात त्यांना संधी देण्यात आलेली नाही. विधान परिषद असो वा राज्यसभा कुठल्याही ठिकाणी त्यांना संधी देण्यात आली नाही. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही. पंकजा मुंडे यांच्यासारखं नेतृत्व असतानाही त्यांना नाकारण्यात आलं. त्यामुळं पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा आहे.