जात आणि धर्माच्या नावावर भांडणाऱ्यांना चपराक, चंद्रपूरची ‘ही’ लेक लढतेय धर्म विरहित प्रमाणपत्र मिळवण्यासाठी

प्रीतिशा सहा ह्या स्वतः वकील आहेत. मानवीहक्क या विषयात त्या वकिली करीत आहेत. जात आणि धर्म विरहित प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांनी संघर्ष सुरू केला आहे.

    चंद्रपूर – ‘आपल्या देशातील विषमतेचा सन्मान करण्याऐवजी या विषमतेचे विष कालाविण्याचे काम अधिक होत आहे. ज्यात मानवता भरडली जात आहे. जर मानवतेचाच बळी जात असेल तर मला जातही नको आणि धर्मही नको. अशी भूमिका एका अधिवक्त्या युवतीने घेतली आहे. ही कहाणी आहे चंद्रपूरच्या लेकीची. जीचं नाव आहे, अॅड. प्रीतिशा सहा. केवळ भारतीय राज्यघटनेला सर्वतोपरी मानणाऱ्या चंद्रपूरच्या वकील प्रीतिशा शहा यांनी धर्ममुक्तीचे प्रमाणपत्र हवे आहे. त्यांचे आईवडील हिंदू धर्माचं पालन करतात आणि त्यांचा प्रीतिशा यांना पाठिंबा आहे.

    जात आणि धर्माचा उल्लेख नसणाऱ्या प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी रीतसर अर्ज केला आहे. या अर्जामुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यापुढं वेगळाच पेचप्रसंग उभ ठाकला आहे. कारण अशा प्रकारचा हा पहिलाच अर्ज त्यांच्यापुढे आला आहे. अर्ज फेटाळल्यास कायदेशीर लढाई लढाईसाठी त्या तयार आहेत.

    जात आणि धर्म विरहित प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तिने संघर्ष सुरू केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी तामिळनाडूमध्ये एका महिलेने अशाच पद्धतीचा संघर्ष केला, अनेक वर्षे न्यायालयीन लढाई लढल्यानंतर त्यांना हे प्रमाणपत्र मिळाले आहे. असे प्रमाणपत्र मिळविणाऱ्या भारतातील पहिल्या महिला त्या आहेत, आता यासाठी महाराष्ट्रातील अॅड. प्रीतिशा सहा यांनी पाऊल उचलले आहे.

    प्रीतिशा सहा यांचा परिचय

    प्रीतिशा सहा ह्या स्वतः वकील आहेत. मानवीहक्क या विषयात त्या वकिली करीत आहेत. त्यांचा जन्म हा एका उच्चवर्णीय सुखवस्तू कुटुंबात झाला. आजोबा स्वातंत्र्यसेनानी तर आईवडील खुल्या विचाराचे, त्यामुळे मानवी स्वातंत्र्यासाठी खुले वातावरण होते. एक स्त्री या नात्याने त्यांना कुठलेही बंधने नव्हती. पुणे येथे कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्या चेन्नई येथे कायद्याच्या विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. त्यानंतर त्यांनी चंद्रपुरात परत येऊन जिल्हा सत्र न्यायालयात आपला वकिली व्यवसाय सुरू केला आहे.