
पोलीस विभागाचे अधिकारी ही घटनास्थळी दाखल झाले आहेत. वर्षभरापूर्वी हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला होता.
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हत्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या चितकी गावालगत असलेल्या एका शेतात हत्तीचा मृतदेह आज ०३ ऑक्टोबर रोजी सकाळचा सुमारास आढळून आला. काही नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली. वन विभागाने तात्काळ घटनास्थळ गाठले. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज ०३ ऑक्टोबर रोजी सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या उपक्षेत्र तांबेगडी मेंढा येथील नियतक्षेत्र मुरपार बीटातील चितकी गावालगत असलेल्या शेतात जंगली हत्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पोलीस विभागाचे अधिकारी ही घटनास्थळी दाखल झाले आहेत. वर्षभरापूर्वी हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला होता.
मात्र काही दिवसातच हा कळप मागे फिरला. मात्र या कळपातील एक हत्ती मागील महिनाभरापासून सिंदेवाही तालुक्यातील शेतशिवारात दिसत होता. या हत्तीवर वनविभागाची नजर होती. आज सकाळच्या सुमारास या हत्तीचा मृत्तदेह दिसून आला. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. वनविभाग, पोलीस विभागाची टीम घटनास्थळी ठाण मांडून आहे.