भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे; मुंबई अध्यक्षपदी पुन्हा आशिष शेलार

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने भाजपने पुन्हा मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. भाजपच्या मुंबई अध्यक्षपद पुन्हा आशिष शेलार यांच्या गळ्यात पडणार आहे. तर, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

    मुंबई : देशातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षात (BJP) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत काळजीपूर्वक विचार केला जात आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने भाजपने पुन्हा मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. भाजपच्या मुंबई अध्यक्षपद पुन्हा आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या गळ्यात पडली आहे. तर, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. महाविकास आघाडीविरोधात (MVA) ते पक्षाची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडत होते. तसेच, ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारविरोधातील आंदोलनातही त्यांनी नेतृत्व केले. त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याकडे लक्ष लागले आहे.

    मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) यांना स्थान देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका (BMC Election) डोळ्यासमोर ही वर्णी लागली असली तरी मुंबई अध्यक्ष कोणाला करणार, याबाबत चर्चा रंगली होती. मात्र, पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे मुंबई अध्यक्ष पद देण्यात आले आहे.