“महाराष्ट्राचा महानालायक कोण?”, फडणवीसांवर एकेरीत टीका केल्यांतर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर आक्रमक

फडणवीस यांचा एकेरी उल्लेख देखील उद्धव ठाकरे यांनी केला होता. यानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून प्रतिक्रिया देत आहेत.

  मुंबई – लोकसभा निवडणूकीमुळे राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे. सर्व राजकारणी एकमेकांबाबत हेवे दावे करत आहेत. दरम्यान, प्रचारसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली होती. तसेच फडणवीस यांचा एकेरी उल्लेख देखील उद्धव ठाकरे यांनी केला होता. यानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून प्रतिक्रिया देत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ‘उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली’ असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकास्त्र डागलं आहे.

  सोशल मीडियावर पोस्ट शेअर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. पोस्टमध्ये बावनकुळे यांनी लिहीले आहे की, महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता. पालघर साधू हत्याकांडात ठाकरे मूग गिळून गप्प बसले, १०० कोटी वसुली रॅकेट चालवत कारभार केला, कोविडमध्ये लोक मरत असताना घोटाळे केले, मृतदेहाच्या बॅगमध्ये मलिदा लाटला. याला कोडगेपणा म्हणतात. देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्रिपदावर बसायचं, मुलाला मंत्रिपद द्यायचं आणि बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडायचं याला कोडगेपणा म्हणतात.

  लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आणि वाट्टेल ते बडबडत आहेत. तुम्ही कितीही शिव्याशाप द्या, देवेंद्रजींसारख्या सच्चा नेत्याला त्यानं फरक पडणार नाही पण येत्या निवडणुकीनंतर जनता तुम्हाला मात्र कायमचं घरी बसवेल हे नक्की” अशी पोस्ट लिहित बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

  उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

  दक्षिण मध्य मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर एकेरी टीका केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘२०१४ ची लोकसभा निवडणूक होईपर्यंत आदित्यने निवडणूक लढवण्याचा विचार केला नव्हता. त्यानंतर त्याने विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार केला. त्यावेळी फडणवीसांनी कोपराला गुळ लावण्याचा प्रयत्न केला.’ ते मला म्हणाले, “उद्धवजी मी काय करतो, मी आदित्यला चांगला तयार करतो. आपण अडीच वर्षांनी त्याला मुख्यमंत्री करू”. मी त्यांना म्हटले, आदित्य अजून लहान आहे, त्याच्या डोक्यात काहीतरी घालू नका. त्याला आधी आमदार म्हणून त्याची कारकीर्द सुरू करू द्या. तुम्ही त्याला नक्कीच तयार करा. मात्र मुख्यमंत्रीपद वगैरे त्याच्या डोक्यात घालू नका.”

  उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “देवेंद्रने आम्हाला शब्द दिला. अहो, देवेंद्र जनाची नाही, मनाची तरी ठेवा. त्या दोन्ही तुम्हाला नाहीत, हे आम्हाला माहीत आहे. लाजलज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे हा. जिला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय, ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. तुम्ही कुठल्या खोल्यांमध्ये काय करता ते आम्ही बघू इछित नाही.” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.