पोवई नाका-बसस्थानक मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल; वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपाय

पोवई नाका ते बस स्थानक मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

  सातारा : पोवई नाका ते बस स्थानक मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या व आत जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना इनगेट व आउटगेटकडे वळण्यास निर्बंध घालण्यात आले असून, एसटीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.

  पोवई नाका ते बस स्थानक या मार्गावर व्यापारी, विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फूटपाथवर हातगाडीधारकांनी बस्तान बसविल्याने पादचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरून धोका पत्करून चालावे लागत आहे, शिवाय बस स्थानकाच्या इनगेट व आउटगेटसमोर, तसेच शाहू क्रीडा संकुलासमोर प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याने, वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या सर्व समस्यांची पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दखल घेतली असून, बस स्थानक मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. दि. २५ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, वाहनधारकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.

  बंदी घालण्यात आलेला मार्ग

  १) पोवई नाक्यावरून बस स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बस स्थानकाच्या इनगेट व आउटगेटकडे वळण्यास बंदी राहील.

  २) राधिका रस्त्यावरून बस स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बस स्थानकाच्या इनगेट व आउटगेटकडे वळण्यास बंदी.

  ३) बस स्थानकाच्या आउटगेटमधून बाहेर पडणाऱ्या सर्व एसटी बसेसला उजवीकडे वळण्यास मनाई असेल.

  ४) राधिका चौक व मनाची कॉर्नरला जोडणारा मार्केटयार्डमधील रस्ता नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे.

  वाहतुकीचा पर्यायी मार्ग कसा? 

  १) पोवई नाक्यावरून बस स्थानकाकडे मार्गस्थ होणाऱ्या सर्व एसटी बसेस नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथील सर्कलला वळसा घालून इनगेटमधून बसस्थानकात प्रवेश करतील.

  २) पोवई नाका, राधिका रस्त्यावरून येणारी सर्व प्रकारची वाहने नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथील सर्कलला वळसा घालून बस स्थानक, पोवई नाका, पारंगे चौकाकडे जातील.

  ३) बस स्थानकातील आउटगेटमधून मेढा, महाबळेश्वर, वाई, मुंबई, पुणे बाजूकडे जाणाऱ्या एसटी बसेस तहसील कार्यालय, जिल्हा बँक, पोवई नाका जीएसटी भवन, पारंगे चौक, जुना आरटीओ चौकमार्गे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक व वाढे फाटा बाजूकडे मार्गस्थ होतील.