संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

कोरेगाव पार्क भागातील साधू वासवानी उड्डाणपुल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, यानिमित्ताने बंडगार्डन आणि कोरेगाव पार्कमधील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल करण्यात आला आहे.

    पुणे : कोरेगाव पार्क भागातील साधू वासवानी उड्डाणपुल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, यानिमित्ताने बंडगार्डन आणि कोरेगाव पार्कमधील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल करण्यात आला आहे. येत्या शनिवारपासून (१० फेब्रुवारी) या बदलांची अंमलबजावणी होणार असून, हा बदल यशस्वी ठरल्यानंतर मार्च महिन्यात हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे.

    कोरेगाव पार्क भागातून कॅम्प परिसराला जोडणारा साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाला आहे. लवकरच तो पाडून त्याठिकाणी नव्याने बांधण्याचे नियोजन आहे. त्यानुसार पूल पाडण्यापूर्वी या भागातील वाहतुकीमध्ये काही बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले होते. मात्र हे बदल यशस्वी न झाल्याने पुल पाडण्याचे काम लांबणीवर पडले आहे. आता यानंतर नवे बदल करण्याचे वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे. त्यानूसार, शनिवारपासून बंडगार्डन व कोरेगाव पार्क भागातील वाहतूकीत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आले आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी कळविले आहे

    असा आहे नवा बदल…

    मोरओढा चौक ते ब्लू डायमंड हॉटेल चौक या दरम्यान साधू वासवानी पुलावरून हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. आयबी चौक ते सर्किट हाऊस चौक दरम्यान जनरल अरूण कुमार वैद्य मार्गावर एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. मोरओढा चौकातून आयबी चौकाकडे जाण्यासाठी मोरओढा चौक सरळ सदन कमांड समोरून कौन्सिल हाॅल चौकातून उजवीकडे वळण घेऊन जावे लागणार आहे. पीएमपी आणि अन्य खासगी बसना मोरओढा चौकातून सरळ काहून रस्त्यावरून डावीकडे वळावे लागणार आहे. तारोपोर रोड जंक्शन येथून उजवीकडे वळून ब्लू नाईल चौकात येता येणार असून तेथून मंगलदास चौकात जाता येणार आहे.

    ब्लू डायमंड चौकातून साधू वासवानी पुलावर वाहनांना प्रवेश नसल्याने ब्लू डायमंड चौक ते मोबोज चौक एकेरी मार्ग करण्यात आला आहे. मोबोजो चौकातून डावीकडे वळण घेऊन मंगलदास चौक, आयबी चौक, सर्किट हाऊस येथे जाता येणार आहे. ब्लू डायमंड चौक ते मोबोजो चौक एकेरी वाहतूक असल्याने मोबोज चौकातून मंगलादास रस्त्या मार्गे हाॅटेल ब्लू डायमंड चौकाकडे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यासाठी मोबोज चौकातून बंडगार्डन रस्त्याने श्रीमान हाॅटेल चौक, उजवीकडे वळून कोरेगाव पार्क जंक्शन येथे जाता येणार आहे. आयबी जंक्शन ते सर्किट हाऊस चौक हा एकेरी मार्ग आवश्यकतेप्रमाणे दुहेरी करण्यात येणार आहे.