काशिनाथाच्या नावानं ‘चांगभलं’चा जयघोष; बावधन येथील बगाडाची मिरवणूक उत्साहात

काशिनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात बावधन (ता. वाई) येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी लाखो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद घेतला. राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी सातारा जिल्ह्यातील बगाड यात्रा समजली जाते.

वाई : काशिनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात बावधन (ता. वाई) येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी लाखो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद घेतला. राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी सातारा जिल्ह्यातील बगाड यात्रा समजली जाते. बावधन हे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे इनाम गाव असल्याने त्यांच्या हस्ते बगाड रथाचे पूजन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पोलीस अधीक्षक समीर शेख पारंपरिक वेशात यात्रेत सपत्नीक सहभागी झाले होते.

सोनेश्वर येथून बगाड मिरवणुकीस प्रारंभ

बावधन गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णातीरावरील सोनेश्वर येथून सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यापूर्वी बगाड्या दिलीप शंकर दाभाडे यांना नदीत स्नान घालून देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. त्यानंतर बगाड्यास पारंपरिक पोशाख घालून बगाड्याला झोपाळ्यावर बसविण्यात आले.

बगाड्याचा मान यंदा दिलीप दाभाडे यांना

यावेळी भाविकांनी नोटा व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडाच्या शिडाला बांधले. बगाड म्हणजे दोन मोठी चाके असलेला रथ. या रथावर सुमारे तीस-चाळीस फूट उंचीच्या शिडावर झोपाळ्याच्या साह्याने बगाड्यास चढविण्यात येते. यावर्षी हा मान दिलीप शंकर दाभाडे यांना मिळाला. या बगाड्याला घेऊन हे सोनेश्वर मंदिरापासून बैलांच्या मदतीने बावधन गावापर्यंत धुष्टपुष्ट बैलांच्या मदतीने बावधन गावापर्यंत आणण्यात येते. शिवार निहाय बैल बदलले जातात. बगाड मिरवणूकीत मोठा उत्साह असतो. लहान थोर, युवक, महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात.

राज्यभरातील भाविकांची उपस्थिती

लाखो भाविक या बगाडाच्या यात्रेला राज्यभरातून येतात. सकाळी सुरु झालेले हे बगाड सायंकाळी बावधन गावातील भैरवनाथ मंदिरापर्यंत खिल्लारी बैल जोडीच्या मदतीने आणले जाते. यावेळी बगाड्याचा नवस पूर्ण होतो आणि यानंतर बगाड्याला बगाडावरून खाली उतरवला जाते. शनिवारी रात्री मोठी छबिना मिरवणूक, ढोल ताशा पारंपरिक वादयांच्या गजरात काढण्यात आली होती.

यात्रेला तीनशे वर्षांचा इतिहास

साडे तीनशे वर्षापासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते. बगाड रथाच्या मागे वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाची पालखी सुशोभीत करून ठेवण्यात आली होती. त्याचे भाविक दर्शन घेत होते. काही ठिकाणी बगाड थांबवून विश्रांती घेण्यात येत होती. यावेळी पाच फेऱ्या घालण्यात येत होत्या.

मिरवणुकीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक डॉ शितल जानवे-खराडे,पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, रमेश गर्जे, उपनिरीक्षक कृष्णकांत पवार, स्नेहल सोमदे सह पंधरा अधिकारी, शंभरावर पोलीस अंमलदार व कर्मचारी, होमगार्ड, एक राज्य राखीव दलाची तुकडी, शीघ्र कृती दलाची एक तुकडी एवढा मोठा बंदोबस्त यात्रेसाठी नेमण्यात आला होता.