पुणे पालिका वसतिगृहाचा अनागोंदी कारभार ; अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

पुणे महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाची दुसरी निवड यादी दोन महिने उलटले तरी अद्यापही जाहीर झाली नसल्याने तब्बल ९५ विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  पुणे : पुणे महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाची दुसरी निवड यादी दोन महिने उलटले तरी अद्यापही जाहीर झाली नसल्याने तब्बल ९५ विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  -दुसरी निवड यादी तत्काळ जाहीर करा
  घोले रोड येथील आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाची शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीच्या प्रवेशाची प्रथम निवड यादी (दि.९) ऑक्टोबर २०२३ रोजी जाहीर झाली. मात्र, दोन महिने उलटले तरीही अद्याप दुसरी निवड यादी जाहीर झाली नाही. यामुळे वसतिगृह प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुसरी निवड यादी तत्काळ जाहीर करावी असे निवेदन एनएसयूआयचे जिल्हा महासचिव कृष्णा साठे यांनी पुणे महापालिका समाज कल्याण विभागाचे उप-आयुक्त नितीन उदास यांना दिले आहे.

  ग्रामीण भागातील व गोरगरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना निवासाची सोय नसल्याने महाविद्यालयास उपस्थित राहणे गैरसोयीचे ठरत आहे. दुसरी निवड यादी तात्काळ जाहीर करण्यात यावी अन्यथा पुणे शहर व जिल्हा एनएसयूआयकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एनएसयूआय जिल्हा महासचिव कृष्णा साठे यांनी दिला आहे.

  पुणे महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची पहिली निवड यादी जाहीर होऊन दोन महिने उलटले तरीही अद्याप दुसरी यादी जाहीर झाली नाही. समाज विकास विभागाचा हा अत्यंत ढिसाळ कारभार असून यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या असणारी दुष्काळाची परिस्थिती आणि पालकांकडून मिळणारी तुटपुंजी आर्थिक मदत याचा ताळमेळ घालून पुण्यात राहणे प्रवेशाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कठीण झाले आहे. प्रशासनाने दोन दिवसांत यादी जाहीर केली नाही तर तीव्र आंदोलन करू.

  -कृष्णा साठे, महासचिव, पुणे शहर व जिल्हा एनएसयूआय