सुविधा दिल्यानंतरच पूर्ण टोल घ्या, नागरिकांची मागणी; अक्कलकोट- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची कामे अपूर्णच

टोल पूर्ण रक्कमेने आकारले जात असून संपूर्ण सुविधा दिल्यानंतरच पूर्ण टोल घ्यावा. सध्या आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये २५ टक्के रक्कम कमी करण्याची मागणी स्वामीभक्तांतून होत आहे.

    अक्कलकोट : अक्कलकोट ते सोलापूर (Solapur)या राष्ट्रीय महामार्गावर (Mahamarg) विविध ठिकाणी पुलाचे काम, सेवा (सर्व्हिस) रस्ते, वीज आदी कामे झालेली नाहीतच या बरोबरच वाहन धारकांसाठी मायनर रिपेअर वर्कशॉप, ट्रामा सेंटर, पब्लिक टॉयलेटर, ट्रक्स डॉमेटरी, धाबा यांचा तर पत्ताच नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा, खचणे याबरोबरच रस्त्यावरील मोबाईल टॉवर्स, अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बंद कॅमेरे, एलईडी फलक दर्शक मनोरे कधी चालु कधी बंद, अनेक ठिकाणी पुलावरील दिवाबत्ती बंद अवस्थेत, पिण्याची पाण्याची असुविधा, महामार्गावरील स्वच्छता गृहात अस्वच्छता व पाणी नाही, वेट ब्रीजची असुविधा, डिव्हायडरमधील झाडी पाण्याअभावी वाळू लागली, रोड स्विपर ट्रक फिरविला जात नाही अशा एक ना अनेक तक्रारी स्वामी भक्तांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती स्वामीभक्त कुणाल भालेकर (मुंबई) यांनी दिली आहे. टोल पूर्ण रक्कमेने आकारले जात असून संपूर्ण सुविधा दिल्यानंतरच पूर्ण टोल घ्यावा. सध्या आकारण्यात येणाऱ्या टोलमध्ये २५ टक्के रक्कम कमी करण्याची मागणी स्वामीभक्तांतून होत आहे.

    टोलची रक्कमही अव्वाच्या सव्वा

    अक्कलकोट ते सोलापूर हा चारपदरी रस्ता अर्धवट स्थितीत पूर्ण क्षमतेने रस्ता चालु न होता ठेकेदाराकडून टोल लावण्यात आला आहे. टोलची रक्कम ही अव्वाच्या सव्वा आकारली गेली आहे. अनेक सुविधा अर्धवट असताना देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलमध्ये सवलत द्यायला हवी होती. ज्यावेळी पूर्ण क्षमतेने रस्ता होईल त्यावेळी टोल रक्कम स्विकारायला हवी होती असे स्वामी भक्तांतून बोलले जात आहे. या बरोबरच श्रीक्षेत्र अक्कलकोटपर्यंत रस्ता न येता बायपास रस्ता करण्यात आलेला आहे. मात्र स्वामी भक्तांना सदर रस्त्यामुळे थेट वागदरी, दुधनी पुढे कलबुर्गीपर्यंत पोहोचल्याचे अनेक उदाहरणे आहे. श्रीक्षेत्र अक्कलकोट नजीक रिलायन्स पेट्रोल पंपापासून ते समाधीमठ व श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अद्यावत रस्ते करुन दिशादर्शक फलके लावण्याची मागणी पुढे येत आहे.

    तीर्थक्षेत्र ते तीर्थक्षेत्र जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरुन तीर्थक्षेत्र मूळ स्थान वगळून बायपास रस्ता बनविला आहे, अशी चर्चा स्वामी भक्तांतून होत आहे. सदर रस्त्यामुळे वाहनधारकांची चांगली जरी सोय झाली असली तरी त्या पध्दतीने निविदेतील नमूद सुविधा तरी देण्यात यावी. मगच टोलची आकारणी करावी. महामार्गावर अनेकदा लहान-मोठ अपघात झाले. वाहने बंद पडली. यावेळी अनेकांनी ट्रामाकडे व मायनर रिपेअरीकडे धाव घेतली असता स्वामी भक्तांना सदरचे सेंटर बंद आढळून आल्याने संताप व्यक्त करण्यात आला, अशी उदाहरणे आहेत.

    तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील संपूर्ण वाहन धारकांना पूर्ण क्षमतेने द्यावेत मगच पुर्ण टोल आकारावे अन्यथा सर्वच प्रकारच्या वाहनांना टोल आकारणीमध्ये २५ टक्के सूट देण्याची मागणी पुढे येत आहे.