ललित पाटील पलायनप्रकरणी ६ जणांवर दोषारोपपत्र दाखल; ललित, ललितचा भाऊ व साथीदारासह मैत्रिणींचा समावेश

    पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे ससून रुग्णालयातून पलायनप्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ६ आरोपींविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. एकूण १४ पैकी आरोपींपैकी ६ जणांचा तपास पुर्ण होताच पोलिसांनी दोषारोपत्र दाखल केले.

    या कलमांनुसार दोषारोपपत्र दाखल

    ललितच्या मैत्रिणी अर्चना किरण निकम (वय ३३) आणि ॲड. प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (वय ३९, दोघीही रा. नाशिक), ललितचा भाऊ भूषण पाटील (वय ३४ ) साथीदार अभिषेक बलकवडे (वय ३१, सर्व रा. नाशिक) रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अऱ्हाना (वय ५०, रा. कॅम्प), त्याचा चालक दत्तात्रेय डोके (वय ४०, रा. हडपसर) यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम २२३ (सरकारी कर्मचाऱ्याला बेदरकारपणे कैदेतून किंवा कोठडीतून पळून जाणे), २२४, २२५ (कायदेशीर अटक करण्यास विरोध करणे), १२० (बी) (गुन्हेगारी कट रचणे) आणि २०१ (पुरावे नष्ट करणे) आणि ३४ (समान हेतू) या कलमांनुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

    आतापर्यंत १५ जणांना अटक

    न्यायालयीन कोठडीत असताना ससून रुग्णालयात उपचार घेत तेथून ड्रग्ज रॅकेट चालविले जाणारे रॅकेट पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणले होते. त्यात ललितचा सहभाग समोर आल्यानंतर २ ऑक्टोबरला तो पळून गेला होता. त्याला १५ दिवसांनी पोलिसांनी पकडले. दरम्यान, ललित ससून रुग्णालयातून पलायन केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे. सुरूवातीपासून झालेल्या तपासानंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात दोषारोपत्र दाखल केले आहे.

    अन्य आरोपींचा तपास सुरू राहणार –
    उर्वरित आठ आरोपींचा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७३ (८) अन्वये तपास सुरू ठेवण्यात येणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

    प्रज्ञा कांबळेला मोठी रक्कम दिली

    विनय अऱ्हानाच्या सांगण्यावरून दत्तात्रय ढोके याने ललित पाटील हा कैदी वॉर्डातून पळून गेल्यानंतर त्याला १० हजार रुपये रोख देऊन मोबाइल फोन दिला होता तसेच भूषण हा भाऊ ललित आणि अभिषेक बलकवडे या दोघांशी संवाद साधत असल्याचे दिसून आले आहे. पळून गेल्यानंतर ललित नाशिकला पोहोचला होता आणि अर्चना निकमच्या निवासस्थानी थांबला. प्रज्ञा कांबळे ही पाटील याच्याशी दूरध्वनीवरून संपर्कात होती. पाटील याने नाशिकला आल्यावर प्रज्ञा कांबळेला मोठी रक्कम दिली होती, या सर्व गोष्टी पोलीस तपासात निष्पन्न झाल्या आहेत.