वर्ध्यात बालगृहातील ६४ बालकांना चरखा ओळख व सुत कताईचे प्रशिक्षण, स्वयंरोगाचे मुलांनी गिरवले धडे

मधु यांनी मुलांना सुत कताईचे प्रशिक्षण दिले. मुलांनी प्रत्यक्ष सुत कताईचा आनंद घेतला. संस्थेच्या विश्वस्थांनी आलेले प्रशिक्षणार्थी व पाहुण्यांचे स्वागत केले.

    वर्धा : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्राम विकास संस्था, गोपुरी यांच्या सहकार्याने वर्धा जिल्ह्यातील बाल व निरिक्षणगृहातील १२ वर्षाच्या वरील ६४ बालकांना चरखा ओळख व सुत कताईचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा नुकताच शुभारंभ झाला.

    प्रशिक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सचिन आष्टीकर, बाल न्याय मंडळाचे सदस्य स्मिता बढिये, प्रदीप गौतम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, बालगृह, निरीक्षणगृहाचे अधीक्षक छोटू बोरीकर, समुपदेशक आरती नरांजे, काळजीवाहक श्रीमती रामटेके उपस्थित होते. बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष न्यायाधीश रचना लोहिया यांच्या मार्गदर्शनानुसार सदर प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली.

    बालगृह व निरीक्षणगृहातील बालकांमध्ये महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारांवर आधारित चरखा चालविण्याचे कौशल्य विकसित करणे व त्यांना स्वयंरोजगारा करिता तयार करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या गटातील बालकांना ग्राम सेवा मंडळ, गोपुरीचे कार्यकारी संचालक अतुल शर्मा यांनी गांधी विचारधारा व खादी या विषयावर मार्गदर्शन केले.

    मधु यांनी मुलांना सुत कताईचे प्रशिक्षण दिले. मुलांनी प्रत्यक्ष सुत कताईचा आनंद घेतला. संस्थेच्या विश्वस्थांनी आलेले प्रशिक्षणार्थी व पाहुण्यांचे स्वागत केले. सदर प्रशिक्षण वेगवेगळ्या गटात चालणार असून मुलांना स्वयंरोजगारासाठी तयार करण्यासोबतच गांधी व विनोबा विचारधारेवर आधारित संदेश देण्यात येणार आहे.