एटीएम कार्ड बदलवून शेतकऱ्याची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ हजारात गंडवले

चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री येथील एका शेतकऱ्याला पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलवून परस्पर ३६ हजार रुपये काढून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

    चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री येथील एका शेतकऱ्याला पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलवून परस्पर ३६ हजार रुपये काढून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री येथील सतीश दगडू चव्हाण (वय ४४) हे शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी हाकत असतो. शेती आईच्या नावावर असल्याने शेती कर्जासाठी जेडीसीसी बँक शाखा गणपूर येथे आईच्या नावाने खात उघडण्यात आला आहे. त्यात पीक कर्जाचे ४० हजार रुपये पडून होते. त्यापैकी चव्हाण यांनी १० हजार रुपये अलिकडेच कामानिमित्त काढले होते. त्यानंतर खात्यात ३६ हजार रुपये बाकी होते. उर्वरित रक्कम काढण्यासाठी सतीश चव्हाण हे १८ मे रोजी दुपारी चाळीसगाव येथे आले.

    दरम्यान शहरातील भडगाव रोडवरील एसबीआय बँक एटीएमवर पैसे काढायला आले. परंतु तांत्रिक अडचणीमुळे पैसे निघाले नाही. तेवढ्यात पाठीमागील अंदाजे ३५ ते ४० वर्षाच्या इसमाने पैसे काढून देण्याच्या बहाण्याने चव्हाणकडून एटीएम कार्ड घेतले व पिन टाकायला लावला. तरीही पैसे मशीन बाहेर आले नाही. म्हणून सदर इसमाने आपल्याजवळील ब्लॉक एटीएम कार्ड चव्हाणांच्या हातात देऊन निघून गेला. त्यानंतर चव्हाण हे पुन्हा पैसे काढायला २० मे रोजी आले. तेव्हा सदर कार्ड ब्लॉक असल्याचे कळाले. मग बँकेच्या शाखेला भेट देऊन चौकशी केली असता सदर कार्ड अलकाबाई नारायण पाटील या नावाचे निघाले. चव्हाणांनी खात्यातील पैशाची खात्री केली. तर खात्यातील ३६ हजार रुपये अज्ञाताने काढलेले दिसून आले. त्याचवेळी सतीश चव्हाण यांना धक्का बसला.

    १८ मे रोजी अंदाजे ३५ ते ४० वर्षाच्या इसमानेच फसवणूक केल्याची खात्री झाली. त्यानंतर चाळीसगाव पोलीस स्थानक गाठून सतीश दगडू चव्हाण यांनी अज्ञातांविरुद्ध २३ मे रोजी रात्री गुन्हा दाखल केला आहे.