चांदवडच्या मका व्यापाऱ्यांची फसवणूक; दिंडोरी येथील एकावर गुन्हा दाखल

सुरुवातीचा व्यवहार सुरळीत करत चांदवडच्या तरुण मका व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून दिंडोरी (Dindori Crime) येथील एकाने तब्बल ७ लाख ६४ हजार ४८८ रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.

    चांदवड : सुरुवातीचा व्यवहार सुरळीत करत चांदवडच्या तरुण मका व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून दिंडोरी (Dindori Crime) येथील एकाने तब्बल ७ लाख ६४ हजार ४८८ रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी मका व्यापारी भूषण वसंत हेडा (३८, गुजराथ गल्ली) यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून दिंडोरी येथील हेमंत राजाराम ढाकणे (दिंडोरी, म्हसरूळ साहिलपार्क) याच्याविरोधात चांदवड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत चांदवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत भूषण वसंत हेडा यांची श्री ट्रेडिंग नावाची मका व कांदा खरेदी विकीची अधिकृत परवानाधारक फर्म आहे. हेडा यांच्याकडून दिंडोरी येथील हेमंत राजाराम ढाकणे यांच्या विजय हॅथरीज नावाचा व्यवसाय आहे. चांदवडचे युवा व्यापारी भूषण हेडा यांच्याकडून हेमंत ढाकणे यांनी ७ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान १५ लाख ३१ हजार ५१ रुपयांचा ७४५.८५ क्विंटल मका खरेदी केला होता. त्यातील ७ लाख ६६ हजार ५६३ रुपये फिर्यादी हेडा यांच्या एचडीएफसी बँकेतील खात्यात हेमंत ढाकणे यांनी जमा केले.

    मात्र, उर्वरित ७ लाख ६४ हजार ४८८ रुपये ‘आज देतो, उद्या देतो’, असे सांगून सदरची रक्कम मका व्यापारी भूषण हेडा यांना अद्यापपर्यंत दिली नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर भूषण हेडा यांनी चांदवड पोलिस ठाण्यात हेमंत ढाकणे याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव करत आहे.