बाजार समितीतील आडत्याकडून शेतकऱ्याची फसवणूक; कांदा विक्रीनंतर दिला बनावट चेक

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केल्यानंतर बनावट चेक देऊन अडत्याने आर्थिक फसवणूक केली आहे, अशी तक्रार खुणेश्वर (ता. मोहोळ) येथील कांदा उत्पादक शेतकरी शंकर चव्हाण यांनी जिल्हा उपनिबंधकांसह सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.

  सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केल्यानंतर बनावट चेक देऊन अडत्याने आर्थिक फसवणूक केली आहे, अशी तक्रार खुणेश्वर (ता. मोहोळ) येथील कांदा उत्पादक शेतकरी शंकर चव्हाण यांनी जिल्हा उपनिबंधकांसह सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.

  शंकर चव्हाण व त्यांच्या भावाने सन २०२२-२३ या वर्षांमध्ये कांदा लागवड केली होती. त्यानंतर काढणीस आलेला कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडते बाबासाहेब रावसाहेब देशमुख यांच्याकडे १७ फेब्रुवारी रोजी १०८, २७ मार्च रोजी १०१, २९ मार्च रोजी ९९, व ३१ मार्च ५५ पिशवी कांदा विक्रीसाठी पाठवला होता. या सर्व कांद्याची एकूण किंमत १ लाख २३ हजार इतकी झालेली आहे. त्याबाबतच्या पावत्या देखील आडत्याने दिल्या आहेत. २५ जुलै रोजी ६३ हजार रुपयांचा चेक व १ जून रोजी ६० हजार रुपयांचे चेक आडते देशमुख यांनी शंकर चव्हाण या शेतकऱ्याला दिला. दोन्ही चेक बँकेत न वाटता परत आलेले आहेत. या आडत्यास विनंती व विनवणी करून देखील रक्कम दिली नसल्याचे शेतकरी चव्हाण यांनी सांगितले.

  शेतीशिवाय दुसरे उपजीविकेचे साधन नाही. त्यातच यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आणखी खूपच हालाखीची स्थिती निर्माण झाली आहे. आडत्याकडे सातत्याने विनवणी करूनही कांद्याचे पैसे देत नाही. शिवाय उद्धट भाषा वापरत आहे. आडत्याकडून आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

  व्याजासह रक्कम वसूल करावी

  कांदा पिकास उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला व निघालेले उत्पन्न देखील आडत्याकडेच राहिले. अशा दुहेरी संकटामध्ये सापडलो आहे. आडत्याची चौकशी करून कडक कारवाई करावी, त्याचा परवाना रद्द करावा. व्याजासह रक्कम वसूल करून मला न्याय मिळवून द्यावा, आर्थिक फसवणूक केल्यामुळे बाबासाहेब देशमुख या आडत्यावर गुन्हा दाखल करावा, असेही तक्रारी अर्जात म्हटले आहे.

  तक्रारीची शहानिशा करून कारवाई

  संबंधित शेतकऱ्याची तक्रार आहे, प्राप्त अर्जानुसार आडत्याकडे चौकशी केली जाईल. तक्रारी अर्जात सत्यता आढळून आली तर ही बाब चेअरमन व संचालक मंडळासमोर ठेवली जाईल. त्यांच्या सूचनेनुसार संबंधित आडत्यावर कारवाई करून शेतकऱ्याचे पैसे वसूल करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी सांगितले.