पुण्यात बनवली जाणार तब्बल 20 हजार किलोंची मिसळ; शेफ विष्णु मनोहर पेलणार हे ‘शिवधनुष्य’

पुण्यामध्ये तब्बल वीस हजार किलोची मिसळ बनविण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णु मनोहर हे  मिसळ बनवणार आहेत.

    पुणे : महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये तब्बल वीस हजार किलोची मिसळ बनविण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णु मनोहर हे  मिसळ बनवणार आहेत.

    गुरुवार, दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले वाडा येथे १० हजार किलो मिसळ आणि दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ पासून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे १० हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिवादन करण्यासाठी येणा-या बांधवांना हे मिसळ वाटप करण्यात येणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आहे, अशी माहिती संयोजन समितीतर्फे देण्यात आली.

    यंदा सलग दुस-या वर्षी आगळ्या – वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून तब्बल २० हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. पुणेकरांनी महात्मा फुले वाड्यात दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळात आपल्या सोयीने कधीही येऊन मोफत मिसळीच्या उपक्रमाचा आस्वाद घ्यावा. मिसळ हे निमित्त आहे, एकत्र येण्याचे आणि महापुरुषांना वंदन करण्याचे. तरी सर्वांनी या उपक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

    भव्य कढई व हजारो किलो साहित्य

    मिसळ तयार करण्याकरिता १५ बाय १५ फूट आकारातील भव्य कढाई वापरण्यात येणार आहे. कढईची उंची ६.५ फूट असून २५०० किलो वजन आहे. पोलाद, तांबे आणि भक्कम स्टिलचा वापर करुन ही कढई साकारण्यात आली असून झाकणही मोठे आहे. अयोध्येतील विश्वविक्रमानंतर थेट पुण्यातील या उपक्रमाकरिता ही कढई वापरण्यात येणार आहे.