महायुतीला घराचा आहेर ! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपांवर छगन भुजबळांनी केली उद्धव ठाकरेंची पाठराखण

ठाकरे गटावर आरोप देखील केला. यानंतर आता महायुतीमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे.

    मुंबई : संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. यामध्ये मुंबईमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. काल सायंकाळच्या सुमारास घाटकोपरच्या छेडा नगर अनधिकृत होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडली. पेट्रोल पंपावर पडलेल्या या होर्डिंगमुळे तब्बल 14 नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच 74 जण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर होर्डिंगचा मालक भावेश भिडे विरोधामध्ये तडक कारवाई करण्यात आली आहे. भाजपचे राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि भावेश भिडे यांचा एकत्रित फोटो शेअर केला. ठाकरे गटावर आरोप देखील केला. यानंतर आता महायुतीमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे.

    काय म्हणाले होते राम कदम?

    उद्धव ठाकरे व भावेश भिडे यांचा फोटो राम कदम यांनी शेअर केला आहे. शेअर करताना लिहिले आहे की, “14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे..श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात.. मनाला चीड आणणारे हे चित्र.. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होते.. टक्केवारीसाठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर.. आजही टक्केवारी साठी  4 लोकांचे नाहक बळी घेता आहेत.. कुठे फेडणार हे पाप..?” असा घणाघात राम कदम यांनी केला आहे. त्यानंतर छगन भुजबळ यांनी ठाकरेंवर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

    छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

    घाटकोपर येथील अनधिकृत होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेला भाजपने ठाकरे गटाला कारणीभूत ठरवले आहे. तसेच ठाकरे गट व आरोपी भावेश भिडे यांचे संबंध असल्याचा आरोप केला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “सरकार आमचं, महानगरपालिकाही आमचीच आहे. यात उद्धव ठाकरेंचा काय संबंध? असे अनेक लोक धंदेवाईक नेहमी आमच्याकडेही पुष्पगुच्छ घेऊन येतात. माझ्याकडे कोणीही येतं आणि फोटो काढतं. सगळ्यांकडेच असे फोटो असतात. त्यामुळे यावरून कोणी अर्थ काढलेला योग्य नाही. यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये. तो कितीही मोठा असला तरीही त्याच्यावर कारवाई होईल” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी देत उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे. तसेच महायुतीला घराचा आहेर दिला आहे.