आव्हाडांच्या वक्तव्यावरुन भुजबळांचा शरद पवार गटाला टोला; म्हणाले, ‘उरलेला गट पक्ष संपवण्यासाठी…’

जितेंद्र आव्हाड यांच्या श्री रामांवरील वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भुजबळांनी शरद पवार गटाला टोला लगावला आहे. ‘अती शहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी उपमा छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाला दिली आहे. +

    पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये (NCP) उभी फूट पडली. यानंतर राष्ट्रवादीतील जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सातत्याने शरद पवार (Sharad Pawar) व त्यांच्या गटावर निशाणा साधताना दिसत असतात. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या श्री रामांवरील (Shree Ram) वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भुजबळांनी शरद पवार गटाला टोला लगावला आहे. ‘अती शहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी उपमा छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाला दिली आहे.

    शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राम मासांहारी आहे या वक्तव्यामुळे राजकारण तापले, सत्ताधारी पक्षांनी राज्यभर आंदोलनं करत त्याचा तीव्र विरोध दर्शवला. याबाबत  प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “अति शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण आपण ऐकली असेल. पवार साहेबांचा जो उरला सुरला गट आहे तो पक्ष संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही.” अशा शब्दांमध्ये टोला लगावला आहे.

    शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावे असे छगन भुजबळ यांचे आवाहन

    अजित पवार यांनी बंड पुकारुन सत्तेमध्ये सामील झाल्यापासून पक्षामध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर अजित पवार गटाकडून सातत्याने शरद पवारांनी अजित पवार यांना आशिर्वाद द्यावा आणि पाठबळ द्यावे अशी भूमिका मांडण्यात येते.  आता मंत्री छगन भुजबळ यांनी देखील याबाबत आवाहन केले. छगन भुजबळ म्हणाले, “अजित दादा पवारांनी सांगितलं आहे की, पवा साहेबांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा तर ते बरोबरच आहे, शरद पवार साहेबांनी आशीर्वाद दिले तर सोन्याहून पिवळचं आहे.”