ब्राम्हण समाजात शिवाजी, संभाजी नावे ठेवत नाही, भुजबळांचा भिडेंना खोचक टोला

    नाशिक : राष्ट्रवादीचे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिंडेंवर खोचक टीका करीत, त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ऐतिहासिक घटनांबाबत वारंवार वादग्रस्त विधाने करणारे संभाजी भिडे यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका करीत, ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे ठेवत नाहीत, अशा शब्दांत भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

    समाजदिन सोहळ्यातून भुजबळांचा भिंडेंवर टोला

    नाशिकमधील मखमलाबाद शैक्षणिक संकुलात आयोजित ‘समाजदिन सोहळा’ या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, काही लोक म्हणतात तुम्ही इकडे तिकडे गेलात. पण आम्ही कुठेही गेलो तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही. संभाजी भिडेंचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. ब्राह्मण समाजात कोणीही शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाहीत. इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभे राहावे लागेल. बाबासाहेबांनी सांगितले शिका आणि सत्तेत सामिल व्हा. बाबासाहेब सत्तेत सामिल झाले आणि आपल्याला संविधान मिळाले.

    निवडणुकीवेळी काहीही करा, मात्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या

    जमीन खरेदी योजनेतून देणार ५० हजार रुपये देणार असल्याचे यावेळी भुजबळ यांनी सांगितले. अनेक योजना अजित पवार तिथल्या तिथं पार पाडत आहेत. निवडणुकीवेळी काहीही करा. मात्र, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या, असा सल्लाही यावेळी भुजबळ यांनी यावेळी दिला.

    आपले देव ओळखायला शिका

    सत्यशोधक समाजाचा विचार महात्मा फुलेंनी मांडला आणि तो पुढे नेला. शिक्षणाशिवाय उद्धार नाही शिक्षण मिळालं तर लोकच आपोआप आपले प्रश्न सोडवतील. अंधश्रद्धेतच जर तुम्ही खितपत पडलात तर तुमचा उत्कर्ष होणार नाही.