छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करतात? शिवसेनेतील नेत्याचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात चर्चा

छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ असल्याचे देखील सुहास कांदे म्हणाले आहेत.

    नाशिक : सध्या राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत सुरु आहे. राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाल्यामुळे एक गट महायुतीसोबत तर दुसरा गट महाविकास आघाडीमध्ये आहे. मंत्री छगन भुजबळ हे अजित पवार गटामध्ये असून जोरदार महायुतीचा प्रचार करत आहेत. मात्र शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने धक्कादायक विधान केले आहे. छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ असल्याचे देखील सुहास कांदे म्हणाले आहेत. दरम्यान सुहास कांदे यांचे आरोप छगन भुजबळ यांनी फेटाळले आहेत. भुजबळांवर टीका केल्याने त्याला मीडियात जास्त प्रसिद्धी मिळते, म्हणून कांदे असे वक्तव्य करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    काय म्हणाले सुहास कांदे?

    नांदगाव मतदार संघातून जास्त मते भारती पवार यांना मिळाले तर त्याचे श्रेय आम्हाला आणि शिवसेनेला जाणार आहे. हे श्रेय आम्हाला मिळू नये, यामुळे छगन भुजबळ तुतारीचा (राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार) प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी पक्ष जाणूनबजून तुतारी पक्ष चालवत आहेत. त्यांचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचा दात वेगळे आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आले आहेत, असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.

    पुढे ते म्हणाले, छगन भुजबळ महायुतीचा धर्म न पाळता नाशिकच्या नांदगाव तालुक्यात विरोधी असलेल्या ‘तुतारी ‘ या चिन्हाचा प्रचार व प्रसार करीत आहेत. मंत्रीपदे महायुतीकडून घ्यायची अन् प्रचार आणि प्रसार मात्र विरोधकांचा करायचा. महायुतीचा धर्म पाळत नसाल तर मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देवून खुशाल ‘ तुतारी ‘ वाजवावी असे आव्हान आ. सुहास कांदे यांनी केले.

    छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

    आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री भुजबळ म्हणाले, “कांदे यांचे वक्तव्य चुकीचे आहे. आम्ही महायुतीचे काम करत आहोत. ही आमदारकीची निवडणूक असल्यासारखं कामे करून कमळ निशाणी निवडून आणण्याच्या सूचना दिल्यात आहेत. सुहास कांदे हा आमचा विरोधक आहे, हे सर्वांना माहीत आहे. ते नेहमीच आमच्या विषयी खोटे बोलतात. भुजबळांवर टीका केल्याने त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते. आमच्या लोकांना कांदे बरोबर काम करणे शक्य नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना सर्व मदत वैयक्तिकरित्या करत आहे. आमच्या निष्ठेवर कांदे यांच्या सर्टीफिकेटची गरज नाही,” असे स्पष्ट उत्तर छगन भुजबळ यांनी देत आरोप फेटाळून लावत आहे.