संगमनेरात छात्रभारतीचे ‘अग्निपथ योजने’विरोधात आंदोलन

केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला (Agnipath Scheme) देशभरात विरोध होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू आहेत. शनिवारी (दि.१८) सकाळी छात्रभारती संघटनेच्या विद्यार्थ्यांनी संगमनेर बसस्थानकासमोर आंदोलन केले.

    संगमनेर : केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ योजने’ला (Agnipath Scheme) देशभरात विरोध होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू आहेत. शनिवारी (दि.१८) सकाळी छात्रभारती संघटनेच्या विद्यार्थ्यांनी संगमनेर बसस्थानकासमोर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

    लष्करात जाण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या लाखो मुलांना कंत्राटीकरणाच्या खाईत ढकलणारी अग्निपथ योजना रद्द झाली पाहिजे, अशी मागणी करत छात्रभारतीच्या वतीने निषेध करण्यात आला. १७ ते २२ वर्षाच्या मुलांना ४ वर्षांसाठी लष्करात घेणार मग ४ वर्षांनी त्या मुलांनी करायचे काय? ऐन उच्च शिक्षणाच्या वेळेस मुलांना भरती करुन घेणार आणि मग ४ वर्षांनी त्यांचं भविष्य वाऱ्यावर सोडणार? तरुणांच्या भविष्याशी खेळ करणारी व लष्कराचे कंत्राटीकरण करणारी केंद्र सरकारची ही योजना विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणारी आहे. ही योजना जर मागे घेतली नाही तर महाराष्ट्रातील सर्व खासदार व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर छात्रभारती तीव्र निदर्शने करेल, असा इशारा संघटनेचे संघटक अनिकेत घुले (Aniket Ghule) यांनी दिला.

    यावेळी अनिकेत घुले, दत्ता ढगे, राहुल जऱ्हाड, गणेश जोंधळे, तृप्ती जोर्वेकर, पूजा भालेराव, विशाल शिंदे, हृतिक वर्पै, पायल सुरसे, अवंतिका जोर्वेकर, श्वेता शेटे, राधेश्याम थिटमे, कमलेश गायकवाड, अश्विन गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाही दिल्या.