
पहिल्या वर्गात शिकणारी ही चिमुकली दार ठोठावून रडकुंडीला आली. दार उघडले जात नाही असे लक्षात आल्यावर ती रडू लागली.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधील रोजाबाग येथील शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरते. या शाळेमध्ये सकाळी आठ वाजता शाळेत मुले येतात आणि शाळा सुटल्यावर साडेबारा वाजता मुले घरी जातात. सोमवारी शाळा सुटल्यानंतर वॉचमन विठ्ठल बमने याने शाळेच्या खोल्यांना कुलूप लावले आणि तो निघून गेला. परंतु एका वर्गात चिमुकली अडकली. पहिल्या वर्गात शिकणारी ही चिमुकली दार ठोठावून रडकुंडीला आली. दार उघडले जात नाही असे लक्षात आल्यावर ती रडू लागली. शाळा सुटली तरी मुलगी घरी आली नाही, म्हणून तिचे पालक शाळेत आले. तेव्हा त्यांना वर्गखोलीतून रडण्याचा आवाज आला.
त्यांनी खिडकीतून डोकावले असता मुलगी दिसली. दरम्यानच्या काळात परिसरातील नागरिकदेखील त्या ठिकाणी जमा झाले. खोलीचे कुलूप तोडून नागरिकांनी चिमुकलीला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. पालकांनी वॉचमन बमनेवर कारवाई करण्याची मागणी केली. वॉचमन कुलूप लावून निघून गेला आणि शाळेच्या वर्गखोलीत चिमुकली अडकली. अखेर नागरिकांनी कुलूप तोडून मुलीची सुटका करत तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. ही घटना सोमवारी मनपाच्या रोजाबाग शाळेत घडली.