आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सुनीलच्या अंतयात्रेत आलेल्या भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांना विरोध!

मुकुंदवाडीतील राजनगर येथील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

    छत्रपती संभाजीनगर : आरक्षण नाही, तोपर्यंत कोणत्याही नेत्यांनी आमच्यात येऊ नये. जसे आलात तसे परत जा, वाद नको असेल तर कोणीतरी यांना इथून घेऊन जा… असा रोष मराठा समाज बांधवांनी व्यक्त केला. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सुनील कावळे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांना समाज बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

    मुकुंदवाडीतील राजनगर येथील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दि.२० ऑक्टोबर रोजी सकाळी मुकुंदवाडी गावातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे आले होते. त्यांना पाहून समाज बांधवांनी यांना घेऊन जा, यांचे इथे काम नाही, आमदाराला इथून घेऊन जा अशी मागणी केली. तसेच मराठा समाजाचे बळी घेणाऱ्या आमदाराचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, अशी घोषणाही देण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी घोषणा देणाऱ्या समाज बांधवांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला.

    समाजबांधवांकडून होणारा रोष पाहता बागडे यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला. तसेच आमदार नारायण कुचे हे सुद्धा मुकुंदवाडी येथे आले होते, मात्र पोलिसांनी त्यांना परत पाठविले, अशी चर्चा यावेळी नागरिकांमध्ये सुरू होती. विनाकारण वाद वाढू नये म्हणून यावेळी माध्यम प्रतिनिधींनी आमदार हरिभाऊ बागडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, विनाकारण वाद वाढू नये म्हणून मी इथून निघून जातोय. मी काल त्यांच्या घरी जाऊन त्यांचे कुटुंब व नातेवाईकांना भेटून आलोय.