औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामांतर; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा पुननिर्णय घेण्यात आला. लवकरच ठराव करुन प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असेही त्यांनी सांगितले.

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाने तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर (Sambhaji Nagar) आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव (Dharashiv) करण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे. ठाकरे सरकारने शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने स्थगित केला होता. दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणे, थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड आदी निर्णय घेण्यात आले होते.

    आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा पुननिर्णय घेण्यात आला. लवकरच ठराव करुन प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असेही त्यांनी सांगितले.

    राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचे पत्र दिल्यानंतर धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली होती. याआधीही हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM  Devendra Fadnavis) यांनी आक्षेप घेतला होता. हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकारने आज पुन्हा घेतले.

    नामांतराचा घाईत घेतलेला निर्णय चुकला : देवेंद्र फडणवीस
    औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर अवैध होता. घाईत घेतलेला निर्णय चुकल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. बहुमत चाचणीची सूचना असताना नामांतराचे ठराव मंजूर करण्यात आले, त्यामुळे नव्याने हे ठराव घेण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. कोणत्याही निर्णयांना स्थगिती दिलेली नाही. अल्पमतात असताना नामांतराचे निर्णय घेणे अयोग्य आहे. ज्या सरकारकडे बहुमत ते सरकार निर्णयांना मंजुरी देईल. औरंगाबादचे संभाजीनगर होणारच असे फडणवीसांकडून स्पष्ट करण्यात आले होते.