धावत्या रेल्वेसोबत फरफटत जाणाऱ्या आजीचा पोलीस कर्मचारी महिलेने वाचवला जीव

अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या घटनेने स्थानकावर उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले होते.

    छत्रपती संभाजीनगर : धावत्या रेल्वेच्या दारात लटकलेली वयोवृद्ध महिला फरफटत जात असल्याचे पाहून रेल्वे स्थानकावर ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या वयोवृद्ध महिलेला पकडून डब्यापासून दूर केले आणि तिचा जीव वाचवला, अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या घटनेने स्थानकावर उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले होते.

    रेणुका आवटे (७५, राहणार गायत्री मंदिर, जिल्हा नांदेड) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगरात राहणाऱ्या आपल्या मुलीला भेटून बुधवारी रात्री त्या नांदेडला परत निघाल्या होत्या. शिर्डी – तिरुपती एक्सप्रेसने त्या नांदेडला जाणार होत्या. गाडी येऊन थांबलेली होती, आजीबाई डब्यात चढण्यापूर्वीच गाडी सुटली आणि रेल्वेचा वेग वाढताच त्यांचा तोल सुटला, त्यांनी दोन्ही हाताने डब्याच्या कडेला असलेले रॉड घट्ट पकडून ठेवले होते, मात्र त्यांचे पाय प्लॅटफॉर्मवर घासत चालले होते, फरफटत जाणाऱ्या या आजीबाईला पाहून प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचारी धरती ठक्कर यांनी धाव घेतली आजीबाईच्या कमरेला पकडून त्यांनी जोरात त्यांना ओढले व रेल्वे पासून बाजूला केले. ठक्कर यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आजीबाईंचे प्राण वाचले.

    रेल्वे लोहमार्ग पोलीस निरीक्षकांचे : गणेश दळवी

    रेल्वे स्थानकावर अनेकजण उशिरा येतात आणि ट्रेन सुटली की धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात, असे धाडस बऱ्याचदा जीवावर बेतू शकते. अशा घटना होऊ नये यासाठी प्रवाशांनी वेळेवर स्थानकावर यावे. वेळेतच रेल्वेत जाऊन बसावे. धावत्या रेल्वेत चढू किंवा उतरू नये. दारात बसू नये. सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे लोहमार्ग पोलीस निरीक्षक गणेश दळवी यांनी केले आहे.