सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने केली आत्महत्या, शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप

घटनेची माहिती मिळताच त्यांनी नातेवाइकांनी तिला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले.

    छत्रपती संभाजीनगर : सहा महिन्याआधी विवाह झालेल्या एका २० वर्षीय विवाहितेने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी ११ ऑक्टोबरला सकाळी साडे दहाच्या सुमारास सातारा तांडा गावात ही घटना घडली आहे.

    वैष्णवी सुनील राठोड (20) असे या आत्महत्या केलेल्या नवविवाहीतेचे नाव आहे. कन्नड तालुक्यातील मुंडवाडी तांडा येथील वैष्णवी हिचे सहा महिन्यापूर्वी सातारा तांडा गावातील सुनिल राठोड सोबत लग्न झाले होते. घरगुती कारणावरुन मंगळवारी सकाळी घरात कोणीही नसताना वैष्णवीने साडीच्या साह्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच त्यांनी नातेवाइकांनी तिला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले.

    सासु व नणंद या नेहमी तिचा छळ करत होत्या. तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होत्या. सततच्या छळास कंटाळुन तिने आत्महत्या केली, असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विष्णु जगदाळे करत आहेत.