सुमारे पावणे सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर जानेवारी महिन्यात महापालिकेची निवडणूक झाली आणि ११५ नगरसेवक निवडून आले. हे नगरसेवक २९ प्रभागांमध्ये विभागले गेले आहेत. महापौर निवडीनंतर आतापर्यंत या नगरसेवकांची तीनवेळा सर्वसाधारण सभा झाली. यातील दोन सर्वसाधारण सभेमध्ये पुतळा बसवण्याचे, चौकाचे नामकरण करण्याचे, रस्त्याचे नामकरण करण्याचे प्रस्तावच अधिक होते.
मे महिन्याच्या। सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर ४३ विषय होते, त्यापैकी १८ ते २० विषय चौक रस्त्यांच्या नामकरणाचेच होते. पुतळ्याच्या संदर्भातील विषयांचा देखील या पत्रिकेत समावेश होता. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे केवळ राष्ट्रगीत म्हणून सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली.
पुतळा आणि नामकरणाचे विषय मोठ्या प्रमाणावर नगरसेवकांकडून मांडले जात असल्यामुळे शहरातील पुतळ्यांची पालिकेच्या लेखी किती संख्या आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या शहर अभियंता विभागातर्फे झोन निहाय पुतळ्यांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीचा अभ्यास केला असता शहरासाठी पालिकेने केलेल्या दहा झोन मध्ये ११५ पुतळे असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी ५३ पुतळे अधिकृत असल्याचे पालिकेने टिप्पणीत म्हटले आहे.
| झोन क्रमांक | अधिकृत पुतळे | अनधिकृत पुतळे | माहिती उपलब्ध नसलेले पुतळे | एकूण पुतळे |
| झोन १ | ०२ | ०० | १० | १२ |
| झोन २ | ०७ | ०७ | ०० | १४ |
| झोन ३ | ०२ | ०० | ०१ | ०३ |
| झोन ४ | ०४ | ०० | ०० | ०४ |
| झोन ५ | १९ | ०० | ०० | १९ |
| झोन ६ | ०९ | ०० | १२ | २१ |
| झोन ७ | ०० | ०० | ०७ | ०७ |
| झोन ८ | ०० | ०० | ०७ | ०७ |
| झोन ९ | ०७ | ०० | ०० | ०७ |
| झोन १० | ०३ | ०४ | ०२ | ०९ |
| एकूण | ५३ | ११ | ५१ | ११५ |






