
नील आणि रवी हे दोघे सेलगाव (जि. जळगाव) येथील रहिवासी आहेत. दोघेही दूध डेअरी परिसरातील एका ज्वेलरी दुकानात ऑफिस बॉय म्हणून कामाला होते. दरम्यान सुनीलने तिथे नोकरीला असलेल्या मुलीसोबतच प्रेमविवाह केला आहे. त्यासाठी त्याने मित्रमंडळींकडून उसने पैसे जमा केले होते.
छत्रपती संभाजीनगर: प्रेमविवाह करण्यासाठी घेतलेले उसने पैसे फेडण्यासाठी मित्राला सोबत घेऊन चक्क मंगळसूत्र चोरी करण्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar City) पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने या प्रकरणात दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. सेवानिवृत्त शिक्षिकेचं दोन तोळ्यांचं मंगळसूत्र हिसकावल्याचा गुन्हा उस्मानपुरा ठाण्याच्या हद्दीत दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. पहिला गुन्हा केल्यानंतर आरोपीला चार दिवसांत बेड्या ठोकण्यात आला आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. सुनील सपकाळ (वय 21 वर्षे), रवी उर्फ गोलू महाजन (वय 20 वर्षे, दोघे रा. हायकोर्ट कॉलनी, संग्रामनगर, सातारा परिसर) अशी आरोपींची नावं आहेत.
पोलिसांकनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील आणि रवी हे दोघे सेलगाव (जि. जळगाव) येथील रहिवासी आहेत. दोघेही दूध डेअरी परिसरातील एका ज्वेलरी दुकानात ऑफिस बॉय म्हणून कामाला होते. दरम्यान सुनीलने तिथे नोकरीला असलेल्या मुलीसोबतच प्रेमविवाह केला आहे. त्यासाठी त्याने मित्रमंडळींकडून उसने पैसे जमा केले होते. हे पैसे परत देण्यासाठी संबंधितांनी तगादा लावला. उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी सुनीलने मंगळसूत्र चोरी करण्याचा मार्ग निवडला. त्यासाठी त्याने रवीला सोबत घेतलं.
कशी झाली चोरी?
दरम्यान 5 मे रोजी पहाटेच त्यांनी दुचाकी काढली. उस्मानपुरा भागातील देवानगरीत ते गेले. एक वृद्ध महिला मॉर्निंग वॉक करीत असल्याचं दिसल्यावर त्यांनी बीड बायपासकडे जाणारा रस्ता विचारला. रवी दुचाकी चालवीत होता. त्याचवेळी सुनीलने निवृत्त शिक्षिकेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचं मंगळसूत्र हिसकावलं आणि पोबारा केला.
चोरी केलेलं मंगळसूत्र एका ज्वेलर्सला विकलं
वृद्ध महिलेचं मंगळसूत्र चोरी प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेनंतर तत्काळ तपास सुरू केला. यासाठी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल म्हस्के आणि प्रवीण वाघ यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. फुटेज मिळताच सातारा परिसरातील खबऱ्यांना दाखवलं. त्यानंतर सुनील आणि रवी यांची ओळख पटली. त्यानुसार पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेलं मंगळसूत्र एका ज्वेलर्सला विकलं असल्याची माहिती दिली.
सुनीलने सोबत काम करणाऱ्या मुलीसोबतच प्रेमविवाह केला होता. मात्र या लग्नासाठी त्याने अनेक ओळखीच्या लोकांकडून उसने पैसे घेतले होते. उसने पैसे देणाऱ्या लोकांकडून सुनीलकडे पैसे परत देण्यासाठी मागणी होऊ लागली. पण पैसे नसल्याने चक्क मंगळसूत्र चोरी करण्याचा त्याने निर्णय घेतला. यासाठी त्याने एका मित्राची मदत घेतली. पण पहिल्याच चोरीनंतर त्याला पोलिसांनी अटक केलं आहे.