चिकन शोरमा खाताय सावधान! मुंबईत झालाय तरूणाचा मृत्यू

मुंबईच्या मानखुर्दमधील 19 वर्षीय तरुणाचा शोरमा खाल्ल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    मुंबई : सध्या तरुणामध्ये जंक फुड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र मुंबईतील एका तरुणाला शोरमा खाल्ल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. मुंबईच्या मानखुर्दमधील 19 वर्षीय तरुणाचा शोरमा खाल्ल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून बेकायदेशीर शोरमा विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर मुंबई महापालिका ॲक्शनमोडमध्ये आली असून बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

    मानखुर्द ट्रॉम्बे परिसरामध्ये ही घटना घडली. या प्रकरणामध्ये कोर्टाने आनंद कांबळे आणि अहमद शेख यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच शोरम्याचे नमुने देखील घेण्यात आले आहे. हे नुमने चाचणीसाठी अन्न औषध प्रसाधन आणि फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आहेत. मुंबई पोलीस पुढील तपास करत असून शोरम विक्रेत्याकडून अस्वच्छ आणि खराब कोंबड्यांचे मांस वापरण्यात आले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश भोकसे (वय,19 वर्ष) हामीद सय्यद (वय,40 वर्ष) हे दोघे 3 मे रोजी शोरमा खायला गेले होते. शोरमा खाल्ल्याने प्रथमेशच्या पोटामध्ये दुखू लागले. आणि उलट्या होऊ लागल्या. प्रथमेशची पोटदुखी वाढल्यानंतर त्याला कुटुंबियांनी पालिका रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र तिथे देखील त्याची प्रकृती न सुधारल्यामुळे त्याला प्राईव्हेट हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले. प्रथमेशला 5 मे रोजी केएम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे उपचार करुन त्याला घरी सोडण्यात आले होते. मात्र रविवारी पुन्हा त्याची तब्येत बिघडली. परत प्रथमेशला केएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण सोमवारी प्रथमेशचा दुर्देवी मृत्यू झाला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंदे यांनी दिली आहे.