
महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी राज्यपाल आणि भाजपाच्या काही नेत्यांनी माफी मागावी अशी भूमिका अजित पवार यांनी अधिवेशनात घेतली होती. आता अजित पवारांच्या या वक्तव्यानं छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या बलिदानाचा अपमान झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले आहेत.
मुंबई:औरंगजेब क्रूर नव्हता, असं वक्तव्य करुन वाद निर्माण केलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) संतापले आहेत. औरंगजेबाच्या बाबतीत कुणाचं प्रेम उतू चाललं आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Rashtrawadi Congress) सातत्यानं इतिहास बदलण्याचा जो प्रयत्न होतोय, त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, या अजित पवारांच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली आहे. अजित पवारांन या वक्तव्यप्रकरणी माफी मागितली पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. अजित पवारांकडून (Ajit Pawar) ही अपेक्षा नव्हती, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी राज्यपाल आणि भाजपाच्या काही नेत्यांनी माफी मागावी अशी भूमिका अजित पवार यांनी अधिवेशनात घेतली होती. आता अजित पवारांच्या या वक्तव्यानं छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या बलिदानाचा अपमान झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे अजित पवारांनी या प्रकरणी माफी मागितली पाहिजे, असं शिंदे पुढं म्हणाले. सगळ्यांनाच सारखा न्याय असला पाहिजे असंही शिंदे म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीकास्त्र
ज्या औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, राज्यातील अनेक मंदिर तोडून टाकली, उध्वस्त केली, माय-भगिनींवर अत्याचार केले त्याचा पुळका कुणाला येतो, त्यावरुन त्यांची प्रवृत्ती दिसून येते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर असलेलं प्रेम त्यांच्या वृत्तीतून दिसून येतं, त्याचा निषेध करावा तितका कमी आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलय.
काय म्हणाले होते आव्हाड ?
छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर बहादूरगडावर नेण्यात आलं होतं. औरंगजेब हा क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता. असं असतं तर त्यानं तिथलं विष्णूचं मंदिरही तोडलं असतं, तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यानंतर हा वाद आणखी पेटला आहे. त्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नका तर स्वराज्यरक्षक म्हणा, असं विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केलं होतं.