मुख्यमंत्र्यांच्या कार्यतत्परतेची नंदुरबारकरांना आली प्रचिती, एका फोनवर केलंय ‘हे’ काम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आज नंदुरबार (Nandurbar) नगर परिषद नूतन इमारतीचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमात मंचावरुन फोन फिरवला आणि नंदुरबार नगर परिषदचा रखडलेला ७ कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करुन दिला.

    नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या नंदुरबार (Nandurbar) दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या कामाच्या तत्परतेसाठी ओळखले जातात. त्याचीच प्रचिती आज नंदुरबारमध्ये आली. मुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमात मंचावरुन फोन फिरवला आणि नंदुरबार नगर परिषदचा रखडलेला ७ कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करुन दिला. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे सभागृहात सगळ्यांनाच आनंद झाला. (CM Eknath Shinde In Nandurbar)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नंदुरबार नगर परिषद नूतन इमारतीचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी पालकमंत्री विजय कुमार गावित, खासदार हिना गावित, खनिकर्म मंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.

    यावेळी शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं भाषण सुरु होतं. चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण सांगितली. विलासराव आलेले असताना त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी ३ दिवसात मंजूर केला असे सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंचावरुनच अधिकाऱ्यांना फोन लावून ७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेने उपस्थितांनी टाळ्या वाजवीत, घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.