मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सरन्यायाधीश उदय लळीत यांचे अभिनंदन

    मुंबई:- जस्टीस उदय उमेश लळीत यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. एन. व्ही. रमणा यांच्या सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजी संपला असून त्यानंतर न्यायमूर्ती उदय उमेश लळीत म्हणजेच यू. यू. लळीत सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत. लळीत यांच्या नियुक्तीने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्याबद्दल न्यायमुर्ती उदय लळीत यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.

    न्यायमुर्ती लळीत यांना शनिवारी २७ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. “महाराष्ट्र सुपुत्र न्या. लळीत यांची कारकीर्द भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि तिचा गौरव वृद्धींगत करणारी ठरेल,” असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी न्यायमुर्ती लळीत याना शुभेच्छा दिल्या.

    नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. उदय लळीत ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. कोणत्याही हायकोर्टाचे न्यायाधीश नसतानाही उदय लळीत हे देशाचे सरन्यायाधीश झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. या अगोदर १९७१ मध्ये देशाचे १३ वे सरन्यायाधीश एस.एम. सिकरी यांना सरन्यायाधीश होण्याची संधी मिळाली होती.