मुख्यमंत्री शिंदेंनी ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

  मुंबई : जालना मराठा आंदोलन चिघळल्यानंतर आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची अट त्यांनी घातली. त्याचबरोबर मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी प्रथम अट त्यांची आहे. त्याचबरोबर काल त्यांनी सरकारला 30 दिवसांचा अवधी दिला आहे. हा अवधी त्यांनी 5 अटींवर सरकारला दिला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाहा सविस्तर रिपोर्ट

  मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची मागणी

  मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार सांगितले आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंतीही केली. मात्र, मागील दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओवरून या तिघांनाही ट्रोल केले जात आहे. या व्हिडीओवर आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

  मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक

  एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडिया’वर चुकीच्या पद्धतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.

  सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून घेतले एकमत

  मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून, कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं.

  सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न

  आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचं शिंदे यांनी म्हटलं.

  आपण बोलून मोकळं व्हायचं असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंबंधी जी बैठक झाली त्यानंतरच्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला बोलताना दिसत आहेत. हे कथित संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

  मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमका काय संवाद?

  एकनाथ शिंदे – आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.

  अजित पवार – हो……येस

  देवेंद्र फडणवीस – माईक चालू आहे.