उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावात ; जिल्हा निर्मितीच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष

शासन आपल्या दारी" या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यभरात दौरा करणार आहेत. या अनुषंगाने शनिवार (दि. ३०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगाव दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आमदार दादा भुसे यांनी दिली.

    मालेगाव : शासन आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यभरात दौरा करणार आहेत. या अनुषंगाने शनिवार (दि. ३०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगाव दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आमदार दादा भुसे यांनी दिली.

    शासकीय विश्रामगृहावर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत आ. भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या मालेगाव दौऱ्याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे, माजी उपमहापौर निलेश आहेर, माजी नगरसेवक सखाराम घोडके, संजय दुसाने, सुनील देवरे, राजेंद्र जाधव, मनोहर बच्छाव, विनोद वाघ आदी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना आ. भुसे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे हे शुक्रवार दि.२९ रात्रीच मालेगावी मुक्कामाला येत आहेत. मुक्कामी येणारे शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. शनिवारी सकाळी १० वा. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे नाशिक विभागातील महसूल अधिकाऱ्यांची बैठक होणार असून या बैठकीत पावसाची, पिकांची स्थिती, विकासकामे यासंदर्भात आढावा घेण्यात येणार असल्याचे आ.भुसे यांनी सांगितले. यावेळी पाचही जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहतील.

    गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हानिर्मितीचा विषय प्रलंबित असून मुख्यमंत्र्याकडे जिल्हा निर्मिती व नार-पार संदर्भात प्रमुख मागणी करणार असल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली. या बैठकीनंतर कॅम्पातील पोलीस अधिकारी- कर्मचारी यांच्या कार्यालय तसेच निवासस्थान संकुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर पोलीस परेड मैदानावर शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोरी-अंबेदरी व दहीकुटे कालवा, कृषी विज्ञान संकुल, शहरातील रस्ते विकास प्रकल्प व जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजना अशा सुमारे ४०० कोटी रु.च्या विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होईल. राखीव वेळेत सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, तसेच नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यात येणार आहेत. यावेळी आ. कांदे यांनी मनमाड येथील एकात्मता चौक येथे मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले जाणार असून संपर्क कार्यालयात नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती कांदे यांनी दिली.