मुख्यमंत्र्यांचे अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीकेचे बाण

माझ्यासोबत आठ ते नऊ मंत्रीदेखील सत्तेतून बाहेर पडले. एका बाजूला सत्ता, मोठी माणसे आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब, आनंद दिघे यांच्या विचारांचा सामान्य कार्यकर्ता होता. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर ५० आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    मुंबई : विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर (Shivsena) टीकेचे बाण सोडले. राज्यात हिंदुत्वाचे (Hindutwa) सरकार आले असून बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे सरकार स्थापन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

    राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतही काम केले आहे. अनेक नेत्यांचे खटलेदेखील लढवले आहेत. अध्यक्ष सत्ताधाऱ्यांना झुकते माप देतील अशी अपेक्षा नाही. अध्यक्षांकडून निष्पक्ष म्हणून काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेना भाजपचे (BJP) सरकार स्थापन झाले आहे. हिंदुत्वाचे सरकार, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे सरकार स्थापन झाले आहे. आतापर्यंत अनेकजण विरोधातून सत्तेत जातात. मात्र, आम्ही सत्तेतून विरोधात गेलो. या घटनेची राज्यातच नव्हे तर देशातही याची नोंद होईल. माझ्यासोबत आठ ते नऊ मंत्रीदेखील सत्तेतून बाहेर पडले. एका बाजूला सत्ता, मोठी माणसे आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब, आनंद दिघे यांच्या विचारांचा सामान्य कार्यकर्ता होता. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर ५० आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो असेही त्यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे म्हटले की, काहींनी मोठे दावे केले. आमच्या संपर्कात १० आमदार आहेत, २० आमदार आहेत. मी त्यांना नावे सांगण्याचे आवाहन केले होते. त्यांची नावे समजली असती तर त्यांना विमानाने पुन्हा पाठवले असते. एका आमदाराला माघारी पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंड घडवून आणले. शिवसेना नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची पक्षाने शुक्रवारी हकालपट्टी केली होती.